कोरोना : ६५ हजार ६२१ प्रवासी तपासले, अफवा पसरवू नका ! - आरोग्यमंत्री राजेश टोपे
महाराष्ट्र राज्यात कुणालाही कोरोनामुळे घाबरण्याची गरज नाही.
मुंबई : राज्यात कुणालाही कोरोनामुळे घाबरण्याची गरज नाही. विमानांमधील ६५ हजार ६२१ प्रवासी तपासण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्रात एक मुंबई, एक पुण्यात असे दोन संशयित आहेत. आज त्यांचे अहवाल येतील, तेव्हा चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच सगळ्यांनी काळजी घ्यावी, राज्य सरकार सुद्धा योग्य ती काळजी घेत आहे, कोणीही अफवा पसरवू नका, कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे ते म्हणालेत. दरम्यान, आग्र्यातील एका कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचा संशय असलेल्या कुटुंबाचा अहवाल निगेटिव्ह आलाय. सध्या त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
सहा जण निरीक्षणाखाली आहेत. मुंबईत चार आणि पुण्यात दोन संशयित रुग्ण आहेत. पुण्यातील अहवाल आज येईल. त्यानंतर काही ते समजेल. त्यामुळे कोणीही घाबरुन जाऊ नये. राज्यात सहा जण निरीक्षणाखाली असून १४६ जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५५१ विमानांमधील ६५ हजार ६२१ प्रवासी तपासण्यात आले आहेत.
'कोरोना' : ते रिपोर्ट निगेटिव्ह
आग्र्यातील एका कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचा संशय असलेल्या कुटुंबाचा अहवाल निगेटिव्ह आलाय. सध्या त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. आग्रामधील कपूर कुटुंबाय २५ फेब्रुवारीला इटलीहून परतले होतं. तेव्हापासून त्यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. तसेच पुण्यातील लॅबमध्ये त्यांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. ते रिपोर्ट निगेटिव्ह आलेत.
मुंबईत रुग्णांसाठी वेगळे कक्ष तयार
मुंबईत कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी कस्तुरबा हॉस्पिटलसह राजावाडी, वांद्रे भाभा रुग्णालय, कुर्ला भाभा रुग्णालय आणि जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयातही विलगीकरण कक्ष तयार करण्यात येणारेय. कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या वाढल्यास त्या दृष्टीनं सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याच्या उपाययोजना महापालिकेनं सुरू केल्यायत. मुंबईत आढळलेल्या कोरोना संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवलं जातं. येथे सध्या २८ खाटांची सुविधा उपलब्ध आहे.