राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात, आणखी दोन नेत्यांना कोरोनाची लागण
महाराष्ट्रातील जवळपास २४ नेते कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत
मुंबई : देशासह महाराष्ट्रात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यात आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि अरविंद सावंत या दोन नेत्यांचा समावेश झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे, 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत.आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी.
दरम्यान शिवसेना खासदार अरविंद सावंत हेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली असून त्यात त्यांनी म्हटलं आहे 'माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.!'
राज्यातील २० हून अधिक नेते कोरोनाच्या विळख्यात
महाराष्ट्रातील जवळपास 20 पेक्षा जास्त राजकीय नेते कोरोनाबाधित झाले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली होती. त्यात आज आणखी दोन नेत्यांची भर पडली आहे.