मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढ आहे. राज्यात १०१ कोरोनाचे रुग्ण आहेत. तर आतापर्यंत चार बळी गेले आहेत. यापार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी लोक ऐकत नाहीत, अशीच स्थिती दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा संचारबंदी वाढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना याचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे काही गोष्टींमध्ये सुट देण्याची गरज आहे, अशी मागणी विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यात हातावर पोट असणाऱ्यांना महिनाभराचा शिधा तातडीने विनामूल्य देणे,  शहरातील बेघरांना तात्पुरत्या शेल्टरमध्ये हलवून फूड पॅकेट देणे, रोजगार हरवलेल्यांना किमान खर्ची २००० रुपये पोस्टाद्वारे देणे,  शेतमाल विकला न गेलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे आदींचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच राहणे खूपच गरजेचे आहे. चीन, इटली, अमेरिका येथील प्रगत राष्ट्रात भायवह स्थिती आहे. भारताचा विचार केल्यास हे संकट चौपट पटीने वाढू शकते. त्यामुळे कोणीही घराबाहेर न पडता हे संकट परतवून लावूया असे आवाहन अनेकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे, ‘कोरोनो’च्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा, कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी.' देशावरचा ‘कोरोना’चा धोका पूर्णपणे संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा, असे आवाहन त्यांनी  केले आहे. 


संचारबंदी काळात या गोष्टींची आवश्यकता 


१. हातावर पोट असणाऱ्यांना महिनाभराचा शिधा तातडीने विनामूल्य देणे.
२. शहरातील बेघरांना तात्पुरत्या शेल्टरमध्ये हलवून फूड पॅकेट देणे.
३. शहरी सोसायट्या, वस्त्यांमधील व खाजगी सफाई कामगार यांना काम करण्यास मुभा देणे.
४. शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करणे.
५. रोजगार हरवलेल्यांना किमान खर्ची २००० रुपये पोस्टाद्वारे देणे.
६. शेतमाल विकला न गेलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे.
७. दहावी, बारावी व परीक्षा पेपर तपासणीचे काम संचारबंदीचा काळ संपेपर्यंत पूर्णपणे स्थगित ठेवणे.
८. दहावीचा एक विद्यार्थी पॉझिटिव्ह निघाला असल्याने अशा सर्व ठिकाणच्या विद्यार्थी आणि वस्त्यांमध्ये तपासणीची आवश्यकता असणे. परीक्षा आधीच पुढे ढकलल्या असत्या तर ही वेळ आली नसती.
९. अंडी, मासे, चिकन, मटण खरेदी विक्रीला परवानगी देणे. (रोग प्रतिकारासाठी प्रोटीनची गरज)
१०. निराधार, विधवा आणि अन्य सर्व पेन्शन त्वरित जमा करणे.