मुंबई : कोविड-१९चा प्रसार रोखण्यासाठी शहरात १४४ कलम लागू गेले आहे. दरम्यान, विनाकारण घराबाहेर पडाणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. ही वाहने जप्त केली गेली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलिसांनी रविवारी घालून दिलेल्या नव्या नियमांचा भंग करण्याऱ्या पाच हजार ८७७ वाहनचालकांची वाहने गेल्या दोन दिवसात पोलिसांनी जप्त केली. कार्यालयीन अथवा वैद्यकीय आणीबाणी व्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी दोन किलोमीटर पेक्षा जास्त वाहने चालवण्यावर असलेली बंदी मोडल्यामुळे ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


मुंबई शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. घरात राहा, सुरक्षित राहा, असे सांगूनही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कडक पावले उचलावी लागत आहेत. काम नसताना घराबाहेर पडणाऱ्यांना समजून सांगण्यात येत आहे. जे ऐकत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, मार्चमध्ये लॉकडाऊन, सुरु झाल्यापासून पोलिसांनी २५ हजार २७६ नागरिकांवर नियमभंगाचे गुन्हे दाखल केले असून १४ हजार ५०० जणांना अटक केली आहे.