मुंबई : प्रत्येकाने लॉकडाऊनच्या काळात  घरात राहून कोरोनाविरुद्धच्या लढ्याला सहकार्य करा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले  आहे. कोरोनातून ठणठणीत बरे झालेल्यांचा आकडा मोठा आहे. कल्याणमध्ये तर सहा महिन्याची मुलगी या आजारातून बरी होऊन घरी आली, तिच्यासारखे हजारो जणं या आजारावर मात करुन बाहेर पडलेत हे दिलासादायक आहे, असे ते म्हणालेत.


'घाबरुन जाऊ नका, काळजी घ्या'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझे पुन्हा एकदा जनतेला आवाहन आहे की घाबरून जाऊ नका, पुरेशी काळजी घ्या आणि समाजमाध्यमांवर येणाऱ्या गोष्टींची नीट खातरजमा करा, त्यावर सरसकट विश्वास ठेऊन कोणतीही आततायी कृती करु नका. या सगळ्यावर मात करुन लवकरच जनजीवन पूर्ववत होईल, असा विश्वास राज ठाकरे यांनी यावेळी वक्त केला.


प्रत्येकाचे कौतुक करावे तेवढे थोडेचं


कोरोनाशी निव्वळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व राज्यातील प्रशासने दोन हात करत आहेत, बहुसंख्य नागरिक देखील प्रशासनाच्या निर्देशांचं काटेकोर पालन करत आहेत आणि त्यामुळे या आजाराचा जलदगतीने होणारा प्रसार आपण बऱ्यापैकी रोखू शकलो आहोत. या आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या देखील आश्वासक आहे. याबद्दल कोरोनाविरुद्ध लढाईत उतरलेल्या प्रत्येकाचे कौतुक आहे. तसेच ते करावे तेवढ कमीच आहे, असे ते म्हणालेत.



दरम्यान, कोरोनातून लोक ठणठणीत होत आहेत. याचा आकडा मोठा आहे. मात्र, आकडेवारीला ना सरकारी पातळीवर पुरेशी प्रसिद्धी दिली जात आहे. ना माध्यमांमध्ये यावर चर्चा होताना दिसत आहे. कालच मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून ही बाब त्यांच्या देखील निदर्शनास आणून दिली, असे राज यांनी म्हटले.


हा प्रकार चुकीचा आहे!


३ मे पर्यंतच्या लॉकडाऊनच लोक पालन करतील याविषयी शंका नाही. तसेच दुसरे म्हणजे एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे किंवा तशी शक्यता आहे, असं जरी आढळलं तरी त्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. हा प्रकार चुकीचा तर आहेच. पण तो आपल्या सर्वांना नुकसानकारक ठरेल. लोकांचा कल त्याची लक्षणं लपवण्याकडे राहील आणि पर्यायाने लॉकडाऊनसकट केलेल्या अनेक उपाययोजना निष्प्रभ ठरतील, अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली.