मुंबई : कोरोना विषाणूचा फैलाव होत असताना मधुमेह असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलावून नका, असे राज्य शासनाचे तसेच पालिका आयुक्तांचे लेखी आदेश असताना ५५ वर्षांपुढील मधुमेह असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्तीने ड्युटीवर बोलविण्यात येत आहे. गोवंडी पूर्व विभागातील काही कर्मचारी धोका पत्करुन सेवा बजावत आहेत. काहींना रुग्णालयात ड्युटी लावली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या आजाराची माहितीही दिली होती. तरीही शासनाचे आदेश पायदळी तुडवून त्यांना डयुटी करण्यात भाग पाडण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, ५५ वर्षांवरील मधुमेह झालेल्यांना २४ तास सलग ड्युटीही लावली आहे. जर तुम्ही डयुटी बजावली नाही तर तुमचे निलंबन करु, अशी धमकीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. तर दुसरीकडे, याबाबत अधिकाऱ्यांशी सपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, वरिष्ठांचे आदेश आहेत. त्यामुळे आम्ही काहीही करु शकत नाही. त्यांना आपली सेवा  बजवावी लागेल, असे स्पष्ट केले.



कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना समूह संसर्ग टाळण्यासाठी पालिका सुरक्षा रक्षकांना अपुरा सॅनिटायझर, मास्क आदींच्याही पुरवठा करण्यात येत आहेत. त्यामुळे पालिका सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अधिकारी वर्गाच्या हीबाब लक्षात आणूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात ५५ वर्षांवरील मधुमेह असणाऱ्या पालिका सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा पोहोचली तर जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत गोवंडी येथील  एएसओ शेखर उधाराज यांच्याशी संपर्क केला असताना त्यांनी माहिती देण्याचे टाळले. मला तुम्ही कॉल करु शकत नाही. तुम्ही वरिष्ठांशी बोला असे म्हणत फोन कट केला.