मुंबई  : कोरोनाचे संकट आता मोठ्या शहरांपुरते मर्यादीत राहिलेले नाही. कोरोना कधीच गावात घुसला आहे. राज्यात जपळपास पाच जिल्हे ग्रीन झोनमध्ये होते. मात्र, आता संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. त्यामुळे  ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेताना त्यांनी हे आवाहन केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी यंत्रणांना आवश्यक सामग्री वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पोलीस यंत्रणेलाही होमगार्ड आदी आवश्यक मनुष्यबळ मिळवून देण्यात येईल. कोरोनाचे ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी मिळून विशेष दक्षता घेऊन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश यावेळी अनिल देशमुख यांनी दिलेत.


प्रत्येक  जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा अनिल देशमुख घेत आहेत. काल अमरावती येथे त्यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवी राणा, आमदार बळवंतराव वानखडे, विभागीय आयुक्त पियुष सिंह, पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक हरी बालाजी आदी उपस्थित होते.



 अमरावती जिल्ह्यात ३९कंटेन्मेंट झोन, अद्यापपर्यंत आढळलेले १९० रूग्ण आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होत आहेत. पीपीई किट, मास्क, ऑक्सिजन सिलेंडर आदी सामग्री यापूर्वीच  उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. ग्रामीण भागात संक्रमण होता कामा नये. पोलीस दलाला लागतील तेवढे होमगार्ड उपलब्ध करुन दिले जातील. पोलीसांवरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पोलीस दलाच्या कंपन्या मागविण्यात आल्या आहेत. एक कंपनी अमरावतीत आली आहे. पण अकोल्यात गंभीर स्थिती लक्षात घेता तिथे प्राधान्य द्यावे लागणार आहे. मात्र, अजून मनुष्यबळ मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत, असे ते म्हणाले.


अकोला व अमरावती येथे अधिक गंभीर रुग्ण असल्यास त्यांना नागपूर येथे हलविण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी करता येते किंवा कसे, हे तपासण्यासाठी एक पथक नेमण्यात येत आहे. त्यांच्याकडून अहवाल मागवून त्यादृष्टीने निर्णय घेण्यात येईल.  कोरोनावर मात करण्यासाठी सर्वपक्षीय सहकार्य हवे, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, कोरोना संकटकाळात अनेक नवे प्रश्न उभे राहत आहेत.  प्रशासन अहोरात्र काम करत आहे. कामात अनेकदा त्रुटी राहू शकतात. त्या वेळोवेळी दुरुस्त करण्यात याव्यात. मात्र, प्रशासनाचे मनोबल टिकून राहिले पाहिजे. यासाठी सर्वांनी मिळून व प्रशासनाला सहकार्य करून कोरोनाविरुद्धची लढाई जिंकायची आहे. सर्वांच्या सहकार्यानेच आपल्याला या साथीवर मात करता येईल, असे आवाहन गृह मंत्र्यांनी केले.