Corona Update : देशात कोरोनाची चौथी लाट? सर्वाधिक रूग्णवाढ महाराष्ट्रात
आठवड्याभरात कोरोनाचे 50 हजार नवे रूग्ण
Corona Update : कोरोनानं पुन्हा एकदा सर्वांना धडकी भरवलीय. गेल्या काही दिवसांत राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. अशातच गेल्या 24 तासांत देशात कोरोना रूग्णसंख्येबाबत धक्कादायक आकडे समोर आले आहेत.
गेल्या 24 तासांत देशभरात 8 हजार 84 नव्या रूग्णांची नोंद झालीय. तर 10 रूग्णांचा मृत्यू झालाय. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 50 हजारांवर गेलीय. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक 17 हजार 380 रूग्ण महाराष्ट्रात आहे. तर यातले 10 हजारांपेक्षा जास्त रूग्ण एकट्या मुंबईत आहेत.
राज्यात दररोज सरासरी 3 हजार नवे रूग्ण आढळून येतायेत. यातील मुंबईतल्या रूग्णांची संख्या जवळपास 2 हजार इतकी आहे. गेल्या 10 दिवसांतील कोरोना रूग्णांची संख्या पाहिली तर रूग्णवाढ तिपटीनं वाढलीय. याचाच अर्थ देशात कोरोनाची चौथी लाट आलीय.
त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. सध्या अनेकांनी कोरोना संपला असं समजून मास्क, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंगसारखे या नियमांना तिलांजली दिली आहे. मात्र कोरोनाचे रूग्ण याच पद्धतीनं वाढत राहिले तर गाफिल राहणं आपल्याला चांगलच महागात पडू शकतं.
राज्यात कोरोनाची चौथी लाट?
राज्यात कोरोनाची चौथी लाट आली असली तरी काळजी करण्यासारखं काही कारण नाही. मात्र मास्क लावून नागरीकांनी काळजी घेतली पाहिजे तसंच लसीकरण करून घेतलं पाहिजे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढू नये यासासाठी आरोग्य विभागाला सूचना करण्यात आल्या असून लसीकरण आणि टेस्टिंग वाढवली जाईल असंही टोपे यांनी म्हटलं आहे.
बूस्टर डोस मोफत देण्यात यावा अशी नागरीकांची मागणी असून तशी मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. बूस्टर डोस देण्यासाठी 'घर घर दस्तक' मोहीम राबवणार असल्याचं देखील टोपे यांनी म्हटलंय.पुण्यामध्ये म्युकर मायकोसिसचे रुग्ण वाढत असून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचं देखील टोपे म्हणाले