मंत्रालयात कोरोनाचा पुन्हा शिरकाव, एकाच विभागात कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण
राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा डोकं वर काढत आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असतानाच त्याचा फटका राज्याच्या प्रशासनालाही बसत असल्याचं समोर आलं आहे. राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो, त्या मंत्रालयातील एकाच विभागातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना पॉझिटीव्ह आढळलेले हे सर्व कर्मचारी मंत्रालयातील महसूल विभागातील आहेत.
महसूल विभागात काम करणारे 22 कर्मचारी आज एकाच दिवशी गैरहजर होते. याबाबत विभागाकडून माहिती घेतली असताना हे कर्मचारी आजारी असल्याने कामावर आले नसल्याचं समजलं. तर या 22 पैकी आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आलं आहे. उर्वरित कर्मचारीही आजारी असल्याने त्यांची कोरोना चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे हा आकडा वाढण्याची चिन्हं आहेत. मंत्रालयातील एकाच विभागातील कर्मचाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याने या विभागाचे काम होणार कसं असा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. दरम्यान, मंत्रालयातही कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी अशी मागणी होत आहे.