दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातली बैठक संपली आहे. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत लॉकडाऊनच्या गोंधळावर चर्चा झाल्याची माहिती आहे. मुंबईसह वेगवेगळ्या शहरांमध्ये लॉकडाऊन कडक करताना वेगवेगळे नियम लागू केल्यामुळे लोकांमध्ये गोंधळाची स्थिती पाहायला मिळते आहे. मंत्र्यांना न विचारताच लॉकडाऊन कडक करण्याच्या निर्णयामुळे काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीचे मंत्रीही नाराज आहेत. याबाबतच पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीनंतर आता लॉकडाऊनबाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी पावलं उचलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर सरकार चालवताना तीन पक्षात समन्वय ठेवण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरे स्मारकात ही बैठक पार पडली.


लॉकडाऊनबाबत प्रशासनातील अधिकारी मंत्र्यांशी चर्चा न करताच निर्णय घेत असल्याची तक्रार महाविकासआघाडीच्या नेत्यांची आहे. लॉकडाऊनचा निर्णयही परस्पर जाहीर करण्यात आल्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. या विषयावर बोलण्यासाठी पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.


अजित पवार-मुख्यमंत्र्यांमध्येही बैठक


त्याआधी काल संध्याकाळी अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन आणि राज्याच्या आर्थिक प्रश्नांवर चर्चा झाली. महाविकासआघाडीतल्या कुरबुरींवरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. परस्पर लॉकडाऊन वाढवल्याबाबत पवारांनी फोनवरुन मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक पार पडली.