अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं कंबरडे मोडलं आहे. यामध्ये पायाभूत सुविधांच्या कामावर मोठा परिणाम होणार आहे, त्यामुळे अनेक प्रकल्प पूर्ण व्हायला विलंब होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनच्या सुरवातीचे दीड महिना सर्व कामे ठप्प होती. त्यानंतर नियमांचे बंधन घालत पायाभूत सुविधा प्रकल्पांना परवानगी देण्यात आली. मात्र तोपर्यंत या प्रकल्पांवर काम करणारे अनेक मजूर-कामगार हे उत्तर भारतात किंवा त्यांच्या गावी निघून गेले होते. त्यातच सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने उपलब्ध मनुष्यबळाची वाहतूक करत, काम वेगानं करणं अवघड झालं आहे. तसंच लॉकडाऊनमुळे पायाभूत सुविधा प्रकल्पांची काम करणारे काही कंत्राटदारही आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत.


या सर्वांचा परिणाम कमीअधिक प्रमाणात सध्या सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर झाला आहे. यामुळे अनेक प्रकल्पांची कामे धीम्या गतीने सुरु आहेत. 


या विकासकामांना फटका 


मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्प


मुंबईतील सर्व मेट्रोच्या कामांवर परिणाम, मेट्रो 2ए आणि मेट्रो 7 प्रकल्प यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता नाही


मुंबई-गोवा महामार्गच्या रुंदीकरणाच्या कामावर परिणाम


नवी मुंबई विमानतळ प्रकल्प रखडला


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यातील सर्व रस्ते कामांना फटका


राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पांची कामे रखडली


लॉकडाऊनमुळे या सर्व प्रकल्पांची डेडलाईन हुकणार असून आणखी काही महिने या प्रकल्पांची कामे पूर्ण व्हायला लागणार आहेत. अर्थात यामुळे सर्वसामान्य लोकांना या सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांचा फायदा मिळण्यासाठी आणखी काही महिने थांबावं लागणार आहे.


सध्या राज्यासह देशातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता संपूर्ण जनजीवन सुरळीत सुरू होण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे राज्यातील सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यताही कमीच आहे. यामुळे या सर्व प्रकल्पांना उशीर होणार हे नक्की.