दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा होतील का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम आज दूर झाला आहे. विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंबंधात सरकार अनुकूल असून या परीक्षांचं वेळापत्रक मात्र नंतर जाहीर केलं जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकार दोन पर्यायांचा विचार करत आहे. यात पहिला पर्याय परीक्षा देण्याचा तर दुसरा पर्याय परीक्षा न देण्याचाही ठेवण्याबाबत सरकार विचार करत आहे. पण दुसऱ्या पर्यायासाठी सरकार कायदेशीर सल्ला घेत आहे. 


ज्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी परीक्षा देऊन चांगले मार्क मिळवायचे आहेत, त्यांना परीक्षा देण्याचा पर्याय खुला असेल. ज्यांना परीक्षा द्यायची नाही आणि उत्तीर्णचं प्रमाणपत्र मिळवायचं आहे, त्यांच्यासाठी दुसऱ्या पर्यायाचा सरकार विचार करत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची नसेल, तर त्यांना  त्यांच्या मागील परीक्षांच्या मार्कांच्या सरासरीवरून श्रेणी पद्धतीने निकाल दिला जाईल, पण यासाठी सरकार कायदेशीर सल्ला घेणार आहे. 


कोरोनाची काळजी घेऊन योग्य ती खबरदारी घेत परीक्षा पार पाडली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातील सगळ्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हेदेखील उपस्थित होते. 


परीक्षांबाबतच्या अनिश्चितता संपविण्याचा विषय प्राधान्याने हाताळून राज्यातील विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील परीक्षेच्या अनिश्चिततेची भीती संपविण्याच्या दृष्टीने नियोजन करावं लागणार असल्याचं मुख्यमंत्री या बैठकीत म्हणाले. परीक्षा घ्याव्यात याच दृष्टीने पर्यांयाचा विचार केला जात असून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचाही विचार करत असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.