मुंबईकरांना दिलासा ! कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग जवळपास निम्म्यावर
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी
कृष्णात पाटील, मुंबई : मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण गेल्या पंधरा दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग जवळपास निम्म्यावर आला आहे. पंधरा दिवसांपूर्वी मुंबईचा रुग्णसंख्या वाढीचा दर 6.61 % वर होता, तो आज 3.62% वर आला आहे. भायखळा, मुंबई सेंट्रलचा समावेश असणा-या ई वॉर्ड मधील रुग्णसंख्या वाढीचा दर सर्वात कमी म्हणजे 1.7% इतका आहे. मात्र, दहिसरचा समावेश असणा-या आर उत्तर विभागात रुग्णसंख्या वाढीचा दर सर्वात जास्त- ७.४% इतका आहे.
माहिम, दादर, धारावीचा समावेश असणा-या जी उत्तरमध्ये सर्वाधिक ३,२५८ रुग्ण आहेत. मात्र इथं तुलनेनं रुग्णसंख्या वाढ रोखण्यात यश येतंय. तेथील रुग्णसंख्या वाढीचा दर २.६% आहे. जी उत्तर नंतर कुर्ल्याच्या एल विभागात सर्वात जास्त २८४७ रुग्ण आहेत.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण ४४९३१ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १८०९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १४६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २५३६४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबईसारख्या अतिवर्दळीच्या शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं चिंतेचा विषय बनला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत असून त्यातही मुंबईत रुग्णांचं प्रमाण अधिक आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत होतं. पण सध्या ते कमी झालेलं दिसतं आहे.