मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला (Vaccination) गती देण्यासाठी विशेषतः 12 ते 14 आणि 15 ते 17 वर्ष वयोगटातील मुला - मुलींच्या लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी मुंबई महानगरात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘हर घर दस्तक’ ही मोहीम दिनांक 1 जून 2022 पासून सुरु करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

31 जुलै 2022 पर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. घराजवळच्या कोविड लसीकरण केंद्रावर जाऊन पात्र व्यक्तिंनी कोविड लस घ्यावी, यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 


केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक 16 जानेवारी 2021 पासून कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. या अंतर्गत 18 वर्ष वयावरील सर्व पात्र नागरिकांचे पहिल्या मात्रेचे 112 टक्के व दुसर्‍या मात्रेचे 101 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आलेलं आहे. 


दिनांक 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 17 वर्षे वयोगटातील लाभार्थ्‍यांचे तसंच दिनांक 16 मार्च 2022 रोजी पासून 12 वर्ष ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थ्‍यांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण करण्‍यात येत आहे. यासाठी महानगरपालिका व शासकीय रुग्णालयात 107, खासगी रुग्णालयात 125 अशी एकूण 232 कोविड-19 लसीकरण केंद्रे कार्यन्वित आहेत. 


12 ते 14 वयोगटातील लाभार्थ्‍यांचं पहिल्या मात्रेचे 28 टक्के आणि दुसर्‍या मात्रेचे 12 टक्के लसीकरण झालं आहे. तर 15 ते 17 वयोगटातील लाभार्थ्‍यांचे पहिल्या मात्रेचे 57 टक्के व दुसर्‍या मात्रेचे 45 टक्के लसीकरण झालेलं आहे. थोडक्यात, 18 वर्षावरील पात्र नागरिकांच्या तुलनेत 12 ते 17 या वयोगटातील लसीकरण हे अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे.


कोविड संसर्गाच्या चौथ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता, कोविड लसीकरण गतिमान करण्यासाठी आणि सामाजिक प्रतिकार क्षमता निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात दिनांक 1 जून 2022  ते 31 जुलै 2022 पर्यंत “हर घर दस्तक मोहीम 2” राबविण्यात येत आहे. यामध्ये 12 ते 14 वर्ष व 15 ते 17 वयोगटातील सर्व मुलांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासोबतच वृद्धाश्रमातील व इतर वरिष्ठ नागरिक (60 वर्ष व अधिक) यांना प्रतिबंधात्मक मात्रा (बूस्टर डोस) देण्याकरिता कार्यवाही केली जाणार आहे.  


या मोहिमेत महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱयांमार्फत घरोघरी जाऊन भेटी देण्यात येत आहेत. या भेटीआधारे 12 ते 14 आणि 15 ते 17 वयोगटातील पहिली व दुसरी मात्रा न घेतलेली मुले तसेच प्रतिबंधात्मक मात्रा न घेतलेले 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत. 


लस घेण्यासाठी घराजवळच्या लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. तसंच विभाग पातळीवरील शाळा व महाविद्यालयात विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित शिक्षण संस्थांसोबत महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी समन्वय साधत आहेत. जेणेकरुन, पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण करता येईल. या मोहिमेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी म्हणून व त्याद्वारे लसीकरणाला वेग देण्यासाठी विविध समाज माध्यमांचा देखील उपयोग करण्यात येत आहे.


मुंबईतील सर्व पात्र नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे. त्याचप्रमाणे आपल्या पात्र पाल्यांचे देखील लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असं आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी केलं आहे.