मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. मुंबईतील अनेक भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. धारावी भागही कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट आहे. धारावीत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज पुन्हा त्यात वाढ झाली आहे. धारावीत कोरोनाचे आणखी ५ रुग्ण वाढले आहेत. धारावीच्या मुकुंदनगर भागात हे नवे ५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता मुकुंदनगरात एकूण १४ रुग्ण झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धारावीत आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६०वर पोहचली आहे. तर धारावीत आतापर्यंत एकूण ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



महापालिकेकडून धारावी भाग सील करण्यात आला आहे. पालिकेकडून या भागात निर्जंतुकीकरण, ड्रोनद्वारे नागरिकांवर नजर ठेवण अशाप्रकारच्या अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र नागरिकांकडून लॉकडाऊनचं तितकंच पालन होताना दिसत नाही. 


धारावी आशियातील सर्वात मोठी झोपटपट्टी आहे. मुंबईतील अनेक झोपडपट्टीमध्ये कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. अशा दाटीवाटीच्या परिसरात झपाट्याने वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या मोठी चिंतेची बाब ठरत आहे. झोपडपट्टीमध्ये दाटीवाटीने राहणाऱ्या परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव मुंबईसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. 


मुंबईत ज्या ठिकाणी कोरोनाचे जास्त रुग्ण आढळले आहेत त्या विभागांना पालिकेने रेड झोन घोषित केलं आहे. आतापर्यंत जी/दक्षिण (वरळी-प्रभादेवी), ई (भायखळा), डी (ग्रँट रोड), के/दक्षिण (अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम) आणि एच/पूर्व (वांद्रे पूर्व), कुर्ला (एल वॉर्ड) आणि मानखुर्द-गोवंडी-देवनार (एम/ई), एल विभाग कुर्ला आणि एम पूर्व चेंबूर, गोवंडी या विभागांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. 


आतापर्यंत संपूर्ण मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 100वर पोहचली आहे.