Covid19 : मुंबईत परिस्थिती नियंत्रणात, इतकी कोविड सेंटर बंद
महापालिकेनं सुरू केलेल्या ५१७ पैकी ४६५ कोविड सेंटर बंद करण्यात आलीयत.
मुंबई : मुंबईत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं दिसून येतंय. महापालिकेनं सुरू केलेल्या ५१७ पैकी ४६५ कोविड सेंटर बंद करण्यात आलीयत. सद्यस्थितीत केवळ ५२ कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे त्यातले ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणं नाहीत.
दरम्यान कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्ह आढळण्याचं प्रमाण ३५ टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आल्यानं मुंबईत दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झालीय. जगभरात कोरोनाची अनेक मोठया शहरांत दुसरी लाट आल्यानं पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आलीय. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनंही खबरदारी म्हणून बंद करण्यात आलेली कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरू करता येतील अशा स्थितीत ठेवलीयत.
मुंबईच्या महालक्ष्मीमधील जम्बो कोरोना सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ भागांतून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होतेय. त्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्सजवळ तयार करण्यात आलेलं जम्बो कोरोना सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
जम्बो कोरोना सेंटरमध्ये ९०० बेड्स उपलब्ध करून देण्यात आले होते. तसंच २०० ऑक्सिजन बेड्स गंभीर रुग्णांवर उपचारासाठी सज्ज होते. मात्र आता रुग्ण संख्या कमी झाल्यानं ९०० बेड बंद करून केवळ गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी २०० ऑक्सिजन बेड सज्ज ठेवण्यात आलेत.