कोल्हापूर : कोरोनाच्या संकटामुळं अनेकठिकाणी शाळा-कॉलेज बंदच आहेत. जिथं शाळा-कॉलेज सुरू झाली तिथं कोरोनाचा संसर्ग वाढला. अशीच परिस्थिती असेल तर कोरोनाच्या संकटात दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार, असा सवाल आता उपस्थित होतो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये लक्ष्मीबाई पाटील गर्ल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील एका शिक्षिकेला कोरोनाची लागण झाली. त्यामुळं ज्युनिअर कॉलेजातील 100 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांना क्वारंटाईन करावं लागलं. या शिक्षिकेचा पती कोरोना पॉझिटिव्ह असतानाही ती शाळेत शिकवायला येत होती, अशी माहिती समोर आली आहे.


या सगळ्या प्रकाराबद्दल पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, शाळा-कॉलेजात अशी परिस्थिती असेल तर यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार, असा सवाल आता उपस्थित होतो आहे.


यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊच नयेत, असा एक सूर आहे. मात्र सरकारनं त्याबाबत अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही. शाळा-कॉलेज सुरू झाले नाहीत तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे. सुरू झाली तर कोरोनाचा संसर्ग वाढतोय. त्यामुळं शाळा चालक, शिक्षकांसह विद्यार्थी-पालकांचीही अडचण झाली आहे. अशा परिस्थितीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा घ्यायच्या, हे मोठं आव्हानच असणार आहे.