राज्यात पुन्हा निर्बंध आणि मास्क सक्ती? पाहा आरोग्यमंत्री काय म्हणतात...
कोरोना रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्राचा अलर्ट
मुंबई : देशात पुन्हा कोरोना (Corona) रुग्ण वाढू लागल्यानं महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्राने अलर्ट दिला आहे. कोरोना रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिवांनी पाच राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि मिझोरम या राज्यांना अलर्ट दिला असून कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी पंचसूत्री राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध लागणार का? मास्क सक्ती होणार का? याबाबत चर्चांना उधाण आलंय. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले राजेश टोपे?
महाराष्ट्रात तूर्तास नोंद घ्यावी अशी रुग्णसंख्या वाढलेली नाही. महाराष्ट्रात सध्या आढळणारी रुग्णसंख्येची गंभीर नोंद घ्यावी अशी नाही, त्यामुळे पुन्हा निर्बंध लावणं किंवा मास्कसक्तीचा कोणताही विचार नाही असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरोग्य विभागातर्फे निरिक्षण केलं जात असून गरजेप्रमाणे पावलं उचलली जात आहेत आणि सध्या तरी वेट अँड वॉचची भूमिका आहे. घाई करण्याची कोणतीही गरज नाही असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत चढउतार
राज्यात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार होताना दिसत आहे. सोमवारी राज्यात 137 रुग्ण आढळून आले. राज्यात सध्या 660 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक 390 रुग्ण मुंबईतले आहेत. तर ठाण्यात 49 सक्रिय रुग्ण आहेत.
गेल्या चोवीस तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.11 टक्के इतका झाला आहे.