तुम्ही घेतलेली लस तापमानामुळे फेल? तज्ज्ञांच्या दाव्यामुळे वाढलं टेन्शन
तुमच्यापैकी अनेकांनी कोरोनाची लस घेतली असेल. पण ती लस घेताना कोल्ड चेन मेंटेन केली होती का?
दीपक भातुसे/ योगेश खरे, झी २४ तास, नाशिक : तुमच्यापैकी अनेकांनी कोरोनाची लस घेतली असेल. पण ती लस घेताना कोल्ड चेन मेंटेन केली होती का? तुम्ही लस घेण्याआधीच ती बाहेर काढून ठेवली होती का? तुमचं लसीकरण योग्य पद्धतीनं झालंय का? तुम्हाला योग्य पद्धतीनं लस दिलीय का? हे तुम्हाला माहित हवं. नाहीतर कोरोनाचा पुन्हा तुम्हाला पुन्हा दंश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात सध्या सगळीकडंच 35 अंशांच्या वर तापमान आहे. अशा परिस्थितीत अनेकजण कोरोनाची लस घेत आहेत. मात्र उष्ण वातावरणात घेतलेली लस कितपत प्रभावी ठरेल, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मुळात लस घेताना कोल्ड चेन मेंटेन केली जातेय का, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. कारण आईस पॅकमधून काढून आधीच लस टेबलावर ठेवलेली असेल तर तिचं तापमान खोलीच्या तापमानाइतकं होतं. अशी लस कुचकामी ठरते, असं इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टरांनी सांगितलं.
लस घेताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी
लस साठवण्यासाठी साधा फ्रीज चालत नाही.
तर विशेष असा आईस लाईन्ड रेफ्रिजरेटर लागतो.
या रेफ्रिजरेटरमधलं तापमान 2 ते 8 डिग्री असायला हवं.
लस आईस पॅकमध्ये असावी, ती उघडी असू नये.
केंद्रावर लस नेताना त्यावर ऊन पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
अगोदर थंड करून ठेवलेल्या चिमट्यानं लसीची बाटली उचलावी.
लसीची बाटली उघडताना अंगठ्याचा वापर करावा.
डोस काढून झाल्यावर बाटली आइसपॅकमध्येच ठेवावी, असं डॉक्टर सांगतात.
दरम्यान, कोल्ड स्टोरेज चेनची खात्री करूनच लसीकरण केंद्राची परवानगी दिली जाते. शिवाय लसीकरणाआधी संबंधितांना नीट प्रशिक्षण दिलं जातं, असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे.
अनेकदा लस देण्याच्या धावपळीत साध्या मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होते. मात्र दुर्दैवानं तसं झाल्यास मौल्यवान अशी ही कोरोना लस मातीमोल ठरू शकते.
ह्या लशीची क्षमता 70-80 टक्केच आहे. म्हणजे 100 टक्के सरंक्षण ती देऊ शकत नाही पण कोल्डचेन मेन्टेन न केलेली लस टोचली गेली. तर कुणालाही अजिबात कोरानापासून सरंक्षण मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने याकडे गंभीरतेने लक्ष दिले. पाहिजे अन्यथा आपला भ्रम आपल्यासाठी जीवघेणा ठरू शकतो.