ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखण्यासाठी सहा समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती
अन्न व औषधी पुरवठा विभागासमवेत समन्वय साधून ऑक्सिजन पुरवठ्यावर होणार देखरेख
मुंबई : कोविड विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढल्यानंतर रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी देखील वाढली आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याबाबत योग्यरित्या आणि वेळीच कार्यवाही व्हावी, म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ६ समन्वय अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात येईल. हे समन्वय अधिकारी ऑक्सिजन पुरवठादार, सहाय्यक आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन यांच्यात समन्वय राखण्याचे कामकाज पाहतील, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.
मुंबईतील कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखण्याबाबत राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल, अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्री. अभिमन्यु काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी आयुक्त चहल यांनी ही माहिती दिली.
बैठकीच्या प्रारंभी महानगरपालिका आयुक्त चहल म्हणाले की, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका, शासकीय आणि खासगी असे मिळून एकूण १५० कोविड रुग्णालय आहेत. या रुग्णालयांमध्ये आजमितीस २० हजार रुग्णशय्या असून येत्या आठवड्यात २२ हजार इतक्या होणार आहेत. मागील १५ दिवसात मुंबईतील कोविड रुग्णांची दैनंदिन संख्या ८ ते १० हजार दरम्यान स्थिरावली असली तरी पुढील १५ दिवस आणखी महत्त्वाचे आहेत. रुग्णांची वाढलेली संख्या आणि त्यांना लागणारा ऑक्सिजन पाहता पुरवठ्याची व्यवस्था सुरळीत राखणे अत्यंत आवश्यक आहे. मुंबईतील रुग्णालयांना सध्या २३५ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन पुरवठा होत असून वाढती रुग्ण संख्या पाहता अधिकची मागणी शासनाकडे केली आहे, असे श्री. चहल यांनी नमूद केले.
पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, कोविड बाधित रुग्णांच्या उपचारासाठी मुंबई महानगरामध्ये आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असून २ लाख रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी देखील नोंदविण्यात आली आहे. रुग्णशय्यांची संख्या देखील वाढविली जात असून त्यामध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची सोय अधिकाधिक केली जात आहे. त्यामुळे सध्या होत असलेला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखण्याबाबत सर्व यंत्रणांनी आवश्यक तो समन्वय राखणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारे सहकार्य शासनाकडून करण्यात येईल, असे ठाकरे यांनी नमूद केले.
यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्री. अभिमन्यू काळे म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेशासह संपूर्ण महाराष्ट्रात देखील कोविड बाधितांसाठी ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. स्वाभाविकच ऑक्सिजन पुरविणारे उत्पादक, यंत्रणा, वाहने यांच्यावर ताण येत आहे. असे असले तरी मुंबई महानगराची स्थिती लक्षात घेता महापालिकेकडून होणाऱ्या मागणीचा सकारात्मक विचार केला जात आहे. अन्य राज्यातून ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करुन घेण्यासाठी शासनाकडून पाठपुरावा होत आहे. ऑक्सिजन साठा वाढल्यानंतर मुंबई महानगराला अधिकचा ऑक्सिजन साठा प्राधान्याने पुरविला जाईल, असे ते म्हणाले.
सध्याचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखण्यासह त्याचा काटकसरीने वापर करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त चहल म्हणाले की, अन्न व औषध प्रशासन खात्यावर असलेला अत्यंत ताण लक्षात घेता, मुंबईतील ऑक्सिजन पुरवठा संदर्भात समन्वय राखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ६ अधिकाऱयांची समन्वय अधिकारी म्हणून तातडीने नियुक्ती करण्यात येत आहे. मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांसाठी प्रत्येकी ४ विभागास १ याप्रमाणे हे समन्वय अधिकारी कामकाज सांभाळतील. तसेच प्रत्येकी ४ विभागास १ याप्रमाणे एकूण ६ ऑक्सिजन पुरवठादार नेमण्यात येतील.
महानगरपालिकेचे समन्वय अधिकारी हे अन्न व औषध प्रशासन, विभागांचे सहाय्यक आयुक्त आणि ऑक्सिजन पुरवठादार यांच्यात समन्वय साधून ऑक्सिजन पुरवठा योग्यरित्या व वेळीच उपलब्ध होत राहील, यासाठी दक्षता घेतील. खासकरुन ६४ नर्सिंग होममध्ये कोणतीही अडचण उद्भवणार नाही, यासाठी ते समन्वय साधतील. तसेच उपलब्ध ऑक्सिजनचा योग्यरित्या व काटकसरीने वापर करण्यासाठी केंद्र शासनाकडून निर्गमित मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करण्याबाबत या ६४ नर्सिंग होमना सूचना करुन प्रशिक्षित करण्याची कार्यवाही महानगरपालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) हे करतील, असे निर्देशही श्री. चहल यांनी यावेळी दिले. या बैठकीत महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्त आयुक्त, संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी तसेच ऑक्सिजन पुरवठादार हे देखील सहभागी झाले होते.