कल्याण-डोंबिवलीमध्ये लॉकडाऊनची नवी नियमावली
कल्याण डोंबिवली महापालिकेने लॉकडाऊनबाबतची नवी नियमावली जाहीर केली आहे.
कल्याण : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहून कल्याण डोंबिवलीमध्ये १९ जुलै म्हणजेच आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला होता. आता कल्याण-डोंबिवली महापालिकेने लॉकडाऊनबाबतची नवी नियमावली जाहीर केली आहे. कल्याण-डोंबिवलीतल्या कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या क्षेत्रांमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे.
मॉल्स, मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स वगळता सर्व भाजी मार्केटसह बाजारपेठा आणि दुकाने पी १, पी २ प्रमाणे म्हणजेच सम-विषम तारखेप्रमाणे सुरू राहणार आहेत. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दुकानं सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवलीप्रमाणेच ठाणे आणि मीरा भाईंदरमधल्या हॉटस्पॉट क्षेत्रांमध्येही ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच राज्यातल्या महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. लॉकडाऊनला विरोध होत असला तरी दडपणाला बळी पडू नका, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत घेतली. गरज असेल तिकडे लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिले. शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्याना सांगितले.
ठाणे, मीरा भाईंदरमधल्या हॉटस्पॉटमध्ये पुन्हा लॉकडाऊन