ऑक्सफर्डच्या लसीची आता भारतात चाचणी, मुंबईच्या या दोन हॉस्पिटलची निवड
कोरोनावरच्या ऑक्सफर्डच्या लसीची मानवी चाचणी आता मुंबईतही होणार आहे.
मुंबई : कोरोनावरच्या ऑक्सफर्डच्या लसीची मानवी चाचणी आता मुंबईतही होणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटशी करार झाला आहे. भारतामध्ये ऑक्सफर्डची लस यशस्वी झाली तर त्याचं उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट करणार आहे.
कोव्हिशिल्ड या सिरमच्या लसीशीची चाचणी लवकरच भारतात सुरू होणार आहे. देशभरातल्या एकूण १० सेंटरमध्ये १६०० निरोगी लोकांवर या लसीची चाचणी केली जाणार आहे. देशातल्या १० सेंटरपैकी मुंबईत केईएम हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलची या कोरोना चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे.
केईएम आणि नायर हॉस्पिटलमध्ये १६० स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी करण्यात येईल. आयसीएमआरच्या सूचनांनुसार या चाचण्या होतील. या चाचणीचा पहिला टप्पा इंग्लंडमध्ये पार पडला आहे. दुसरी चाचणी इंग्लंडमधील १० हजार लोकांवर सुरू आहे, तसंच अमेरिका आणि ब्राझील या देशातही या लसीची चाचणी घेण्यात येईल.
जे निरोगी आहेत आणि ज्यांची स्वत:ची मनाची तयारी आहे, अशा लोकांचं संमती पत्र घेऊन, त्यांची निवड करण्यात येत आहे. २५ वर्षांच्या आतले आणि वृद्ध माणसांना मात्र यासाठी निवडण्यात येणार नाही, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
ऑगस्टचा शेवटचा आठवडा आणि सप्टेंबर महिन्यात या चाचण्या होतील. स्वत:हून तयार होऊन लसीच्या चाचणीला बरेच लोक येतील, असा विश्वासही महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.