दिलासादायक! मुंबईतला कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग मंदावला
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या मुंबईसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
मुंबई : कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या मुंबईसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या दुपट्ट होण्याचा वेग मंदावला आहे. ७ दिवसांमध्ये दुपट्ट होणारी रुग्णसंख्या आता १३ दिवसांनी दुपट्ट होऊ लागली आहे. १ मे रोजी मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ७,६२५ एवढी होती, हीच संख्या १३ मेरोजी १५,५८१ एवढी झाली.
मुंबईतली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता खासगी रुग्णालयं आणि जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये या महिनाअखेरपर्यंत १० हजार बेडपर्यंत क्षमता वाढवण्यात येणार आहे. तसंच मुंबई महापालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्येही सध्याची ३,५४० बेड क्षमता महिनाअखेरीस ५,८०० करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेतील कोविड टास्क फोर्सच्या आयएएस अधिकारी मनिषा म्हैसकर यांनी फेसबूक पोस्टद्वारे ही माहिती दिली.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा दुपट्ट व्हायचा वेग ११ दिवस एवढा आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे १७,६७१ रुग्ण झाले आहेत, तर ६५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रामध्ये एका दिवसात कोरोनाचे १,५७६ रुग्ण वाढले आहेत. तर मागच्या २४ तासात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २९,१०० एवढी झाली आहे. आजच्या दिवसभरात कोरोनाच्या ५०५ रुग्णांना बरे झाल्यामुळे सोडण्यात आलं. आत्तापर्यंत राज्यातले एकूण ६,५६४ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यामुळे घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत १,०६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.