Corona : राज्यातला लॉकडाऊन वाढणार का? आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
मुंबई : देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. १४ एप्रिलपर्यंत देशभरामध्ये लॉकडाऊन असणार आहे. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढणार का उठवला जाणार असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.
या २१ दिवसांनंतर राज्यातल्या लॉकडाऊन उठवला जाईल का? असा प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारण्यात आला. 'लॉकडाऊन उठवण्याबाबत कार्यपद्धती आहे. लॉकडाऊन उठवायचा किंवा वाढवायचा, याबाबत केंद्र सरकार एडव्हायजरी पाठवतं. १० आणि १५ एप्रिलदरम्यान जी परिस्थिती आहे, त्याचा अभ्यास करुन आणि केंद्राच्या एडव्हायजरीनुसार काम होईल, लॉकडाऊन शिथिल होईल, असं नाही,' असं सूचक विधान राजेश टोपे यांनी केलं आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८०९वर गेली आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे ४९१ रुग्ण आहेत, तर ५६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण ४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचा दर हा ५ टक्के आहे, पण २.५ ते ३ टक्के मृत्यू होतील, असा आमचा अंदाज होता, अशी प्रतिक्रिया राजेश टोपेंनी दिली आहे.
रुग्णालयांवर कारवाईचा इशारा
स्वच्छता न पाळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छतेचा धडा कोरोनाने दिला आहे. सरकारी रुग्णालयात स्वच्छता राखली गेलीच पाहिजे. स्वच्छतेच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत, त्याचे तंतोतंत पालन झालेच पाहिजे, असं राजेश टोपेंनी ठणकावून सांगितलं आहे.
तबलिगीसोबत बैठक
निजामुद्दीनच्या तबलिगी जमात कार्यक्रमाला राज्यातली १,२२५ लोकं गेली होती, अशी माहिती केंद्राने आम्हाला दिली. हे लोकं सहकार्य करत नसल्याचं समोर आलं, तसंच त्यांच्याबाबत चुकीची माहिती पसरवली, याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. सरकारला सहकार्य करण्याचं त्यांनी मान्य केलं आहे. माणुसकी आणि देश महत्त्वाचा असल्याचा संदेश तबलिगी जमातच्या लोकांनी दिला आहे, असं राजेश टोपे म्हणाले.