मुंबई : राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो, असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे. खास करुन मुंबई आणि शहरी भागांमधील लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपत आहे. मात्र महाराष्ट्रामधील करोनाग्रस्तांची संख्या पाहता राज्यातील लॉकडाउनचा कालावधी वाढण्याचा इशारा आरोग्य मंत्र्यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून २३०५ खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहे.


राज्यात आतापर्यंत ५० करोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  राज्यात काल कोरोनाबाधित ६७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ४३ रुग्ण मुंबई,१० मुंबई परिसरातील,पुणे येथील ९ तर अहमदनगर जिल्ह्यातील ३ रुग्ण,वाशिम व रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४९० झाली आहे.


मुंबई महापालिका क्षेत्रासाठी २९२,पुणे महानगरपालिका ४१३,नागपूर महापालिका २१०पथके कार्यरत आहेत. पथकामार्फत घरोघर सर्वेक्षणाचे काम केले जात असून. राज्यभरात सुमारे १८ जिल्ह्यांमध्ये २४५५ पथके सर्वेक्षणाचे काम करीत आहेत.काल पर्यंत सुमारे ९ लाख २५ हजार ८२८ नागरिकांचे सर्वेक्षण केले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.