कोरोनाचे संकट : राज्यात बाधितांचा आकडा ३०० पार, १३ जणांचा बळी
महाराष्ट्र राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा तीनशेपार झाला आहे. मुंबईत एकाच दिवशी ५९ रुग्ण आढळले आहेत.
मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा तीनशेपार झाला आहे. मुंबईत एकाच दिवशी ५९ रुग्ण आढळले आहेत. डोंबिवलीत कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला आहे. राज्यातील बळींची संख्या १३ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १०० रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या आता ३२० वर गेली आहे. रम्यान, राज्यातले कोरोनाविरोधातलं युद्ध अटीतटीचे झाल्याची कबुली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी सरकार सक्षम असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्थलांतर करणाऱ्यांनी आहेत तिथंच थांबावे. त्यांच्या राहण्याखाण्याची सोय सरकार करत आहे. शिवभोजनाची केंद्र वाढवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आज एप्रिल फुल बनवण्याकरिता कोरोनासंबंधी खोटे मेसेज टाकल्यास पोलीस कारवाई होणार आहे. जमाव बंदी उठली आहे, सर्व लोक रस्त्यावर एकत्र यावे अशा स्वरुपाचे मेसेज सोशल मीडियावर येण्याची शक्यता आहे, असे मॅसेज फिरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.
मुंबईत आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. ७५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झालायं. दरम्यान, यामुळे मुंबईत ९ जणांचा बळी गेलाय. तर दुसरीकडे डोंबिवलीत देखील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. ही महिला ऑस्ट्रेलियातून आली होती. आता राज्यातील बळींची संख्या १३ वर गेली आहे.
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे आणखी दोन रुग्ण सापडलेत. कल्याणमध्ये महिला तर डोंबिवलीत एका तरुण पॉझिटीव्ह आढळलेत. तुर्कस्तानातून आलेला कोरोनाबाधित रुग्ण लग्न आणि हळदीला उपस्थित राहल्यामुळेच हे संक्रमण झाल्याचं पुढं आलंय. यामुळे रुग्णांची संख्या १२ वर गेली आहे, तर दोघांना डीस्चार्ज देण्यात आला आहे.
पालघरमधल्या कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सफाळे इथले रहिवासी असलेल्या ५० वर्षांच्या या व्यक्तीवर दोन दिवसांपासून पालघर ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या स्वॅबचे नमुने यायचे आहेत. संपर्कात आलेल्या ११ जणांना क्वारंटाईन करण्यात आलंय.
सांगलीत कोरोनाचा कोणताही नवा रुग्ण आढळलेला नाही. सांगलीतून नव्यानं पाठवलेल्या चारही रुग्णांचे रिपोर निगेटिव्ह आलेत. हे चौघे उपचारासाठी मिरज रुग्णालयात आहेत. त्यांना निमोनीया असल्याचं उघड झालंय. शिवाय परदेशातून आलेल्या ३६ वर्षीय महिलेचाही रिपोर्ट निगेटीव्ह आलाय. त्यामुळे सांगलीतील कोरोना बधितांची संख्या २५ इतकीच आहे.