मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घरात राहा सांगूनही नागरिक ऐकत नसल्यामुळे पोलिसांवरचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच पोलिसांना देखील कुटूंब आहे. दिवस-रात्र महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी रस्त्यावर असलेल्या पोलिसांच रक्षण कोण करणार याची धास्ती कुटुंबियांना देखील आहे. यासाठी एका दहा वर्षाच्या मुलीने पोलिसांत असलेल्या आपल्या बाबाच्या रक्षणासाठी चक्क देवबाप्पालाच ग्रिटिंग पाठवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ग्रिटींग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आरूषी मनेश कदम असं या दहा वर्षांच्या मुलीचं नाव आहे. मनीषचे वडिल हे सीपी ऑफिसमध्ये आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. आरूषीने पाचवीची परिक्षा दिली आहे. लॉकडाऊनमुळे ती घरी आहे पण तिच्यासोबत तिचा बाबा नाही. यामुळे त्याचं रक्षण करण्यासाठी तिने हे ग्रिटिंग तयार केलं आहे. 



देवबाप्पाला आपल्या बाबाप्रमाणेच इतर सेवेत कार्यरत असलेल्या सर्व पोलिसांचे रक्षण करणारं हे ग्रिटिंग तिने बनवलं आहे. 'देवा त्यांच्यावर लक्ष असू देत, त्यांची काळजी घे' अशा आशयाचं हे ग्रिटिंग आहे. आरूषी दादरच्या साने गुरूजी शाळेत इंग्रजी माध्यमात शिकत आहे. तसेच ती लालबागच्या गुरूकूल स्कूल ऑफ आर्ट्समध्ये चित्रकलेचं प्रशिक्षण घेत आहे. 



आरूषीचं सध्या सगळ्याच स्तरावरून कौतुक होत आहे. अनेक पोलिसांनी तिचं कौतुक केलं आहे. 'मुंबई पोलिसांचे मनोबल यामुळे नक्कीच वाढणार आहे म्हणून तुझ्या मुलीकरिता आपल्या सर्व महाराष्ट्र पोलिसातर्फे एकच म्हणावेसे वाटते 'जय हिंद, अशी प्रतिक्रिया गणेश वाराहडी यांनी दिली आहे.