दीपक भातुसे, झी मिडीया, मुंबई : 'पुनःश्च हरिओम'चा नारा देत 'मिशन बिगेन अगेन' सुरू करणाऱ्या राज्य सरकारलाच धक्का बसेल अशी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारमधील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचे वास्तव असलेल्या मंत्रालयाजवळील यशोधन इमारतीतील २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. यात एका आयएएस अधिकारी आणि इतर २५ जणांचा समावेश आहे. सदर आयएएस अधिकारी कोविड टास्क फोर्समध्ये कार्यरत आहेत. तर इतर २५ जणांमध्ये या  इमारतीतील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडे काम करणाऱ्या स्वयंपाकी, घरकामगार आणि वाहन चालकांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी मंत्रालयातील दोन आएएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते अधिकारीही याच यशोधन इमारतीत राहतात. शासनाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे अनेक अतिवरिष्ठ अधिकारी यशोधन इमारतीत राहतात. याच इमारतीत कोरोनाचे एवढे रुग्ण आढळल्याने शासनाची अडचण वाढण्याची शक्यता आहे.


सरकारमध्ये उच्चपदावर काम करणाऱ्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या इमारतीतच कोरोनाचे एवढे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या इमारतीतील यापूर्वी कोरोनाची लागण झालेल्या एका अधिकाऱ्याला त्याच्या घरात काम करणाऱ्या नोकरांमुळे लागण झाल्याचं समोर आलं होतं.



त्यानंतर राज्य सरकारने या इमारतीत राहणारे सर्व अतिवरिष्ठ अधिकारी आणि इमारतीत काम करायला येणारे स्वयंपाकी, घरकामगार, वाहन चालक यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार साधारणतः १५० जणांची कोरोना चाचणी करण्यात या चाचणीचा अहवाल समोर आल्यानंतर सरकारलाही धक्का बसला असणार, कारण या इमारतीतील २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. या २६ जणांमध्ये एक आएएस अधिकारी असून इतर २५ जण हे स्वयंपाकी, घरकामगार आणि वाहन चालक आहेत.