मुंबई: अत्यावशक सेवा असणाऱ्या बेस्टमधील आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या कर्मचाऱ्याला खोकला आणि सर्दीचा त्रास होता. यामुळे त्याने कोरोनाची चाचणी करून घेतली. यामध्ये त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. संबंधित कर्मचाऱ्याने आज बेस्ट प्रशासनाला ही माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत चिंता वाढली; धारावीत आणखी २६ जणांना कोरोनाची लागण

तर बेस्टच्या आणखी एका कर्मचाऱ्याच्या घरातील व्यक्तीला कोरोना झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यालाही इतर नातेवाईकांसोबत क्वांरटाईन करण्यात आले आहे. कालच एका बेस्ट कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. टिळकनगर येथील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी संध्याकाळी त्यानं अखेरचा श्वास घेतला होता. हा कर्मचारी बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागात काम करत होता. त्याला मधुमेह आणि किडनीशी संबंधित आजार होते. यानंतर ज्या कर्मचाऱ्यांना मधुमेह, हृदयविकार, किडनीचे आजार, अस्थमा आणि कॅन्सर आदी आजार असल्यास त्यांनी तूर्तास कामावर रूजू होऊ नये, असे निर्देश बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.


...तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितलात का; राऊतांचा विरोधकांना सवाल

दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे १०७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोनाचे २६ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतील आरोग्य यंत्रणेसमोरील चिंता वाढली आहे. मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २०४३ इतका झाला आहे.