मुंबई : कोरोनाची लागण देशभरात पसरत आहे. देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या ही १६८ वर पोहोचली आहे तर महाराष्ट्रात ४९ रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत आतापर्यंत एका रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबईत खबरदारी घेतली जात आहे. मुंबईचा सर्वात महत्वाचा घटक असलेल्या डबेवाल्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेतला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्या दिनांक २० मार्च २०२० पासून ते ३१ मार्च २०२० पर्यंत डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट व मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाद्वारे घेण्यात आला आहे. त्याच प्रमाणे  १ एप्रिल २०२० पासून सेवा नियमितपणे सुरू राहील. सर्व नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच स्वतःची काळजी घ्यावी व शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे.



मुंबईत सदृश्य लॉक डाऊन करण्यात आलं आहे. शाळा, कॉलेजेस बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच खासगी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्विकारण्यास सांगितलं आहे. तसेच एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी एक दिवस आड करून कामावर यावे आणि ५० टक्के कर्मचारी फक्त कार्यालयात उपस्थित राहावेत असे आदेश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर डबेवाल्यांनी सेवा काही दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.