मुंबईत कोरोनाचा धोका वाढला; चेंबूरमधील टॅक्सी चालकाचा मृत्यू
राज्यातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आहेत.
मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चेंबूर परिसरातील एका टॅक्सीचालकाचा (वय ४५) समावेश आहे. हा व्यक्ती मुंबई विमानतळाच्या परिसरात टॅक्सी चालवायचा. यादरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली होती.
'तबलिगी जमातचा कार्यक्रम झाला नसता तर देशातील परिस्थिती वेगळी असती'
त्यामुळे आता मुंबईतील कोरोना संक्रमित मृतांचा आकडा ३० वर पोहोचला आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये वरळी आणि धारावी या दोन परिसरांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. यापैकी काहीजणांचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला आहे. त्यापैकी वरळी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट मानला जात आहे. या परिसरातील अनेकांना क्वारंटाईनही करण्यात आले आहे.
कनिका कपूरमागोमाग आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीला कोरोना
तर राज्यभरात आतापर्यंत कोरोनाचे ७४८ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या निरीक्षणानुसार राज्यात २१ ते ४० या वयोगटातील सर्वाधिक ४२ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ ४१ ते ७० वयोगटातील रुग्णांची संख्या ३३ टक्के इतकी आहे. तर कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी १७ टक्के नागरिक या ज्येष्ठ व्यक्ती आहेत. तर दोन वर्षांपेक्षा लहान असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९ टक्के इतके आहे.
तर देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ५०५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३,५७७ इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत ८३ लोक मृत्युमुखी पडले आहेत.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत देशात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होताना दिसत आहे. कोरोनाच्या देशातील एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे ६२ जिल्ह्यांमध्ये आढळून आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता सरकारी अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे