मुंबई : मुंबईतील धारावी हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. धारावीत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. धारावीत कोरोनाचे आणखी चार रुग्ण वाढले असून एकाचा मृत्यू झाला आहे. धारावीत आतापर्यंत कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४७वर पोहचली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धारावीतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये शुश्रूषा हॉस्पिटलमधील ६० कर्मचाऱ्यांचं आणि धारावीतील रुग्णांचं धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये विलगीकरण, क्वारंटाईन करण्यात आलं आहे. रविवारपासून या लोकांचं विलगीकरण करण्यात आलं आहे. मात्र अद्यापही त्यांची कुठलीही चाचणी करण्यात आलेली नाही. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कोणतीच सुविधा उपलब्ध नाही.


स्पोर्ट्स कॉम्पेक्समध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असून त्यांची अतिसामान्य सोय करण्यात आली आहे. स्पर्धेला आलेले खेळाडू राहतात तशा गादयांवर जमिनीवर रुग्णांची सोय करण्यात आली आहे. रुग्णांना जेवणासाठी केवळ खिचडी देण्यात येत आहे. 




या लोकांना कस्तुरबात नेणार असं सांगून धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आणण्यात आलं आहे. इथे कोणताही वैद्यकीय कर्मचारी नाही. वैद्यकीय पार्श्वभूमी नसलेले कर्मचारी इथे ठेवण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना रविवारपासून केवळ चहा आणि खिचडी देण्यात येतेय. त्याशिवाय कोणताही पौष्टिक आहार दिला जात नाही. सोमवारीही केवळ चहा देण्यात आला असून अद्याप नाश्ता दिलेला नाही.


स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सर्वत्र धुळीच साम्राज्य पसरलं आहे. ज्या परिस्थितीत ठेवण्यात आलं आहे त्याला विलगीकरण म्हणत नसल्याची शुश्रूषातील कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.