मुंबई : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतर अनेक ठिकाणी लोक विनाकारण घराबाहेर दिसतात, तसंच योग्य कारणाशिवाय गाडी घेऊन फिरतात. त्यामुळे गृहमंत्रालयानं आता आणखी कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा धोका दिवसेदिवस अधिकच वाढत असताना काही लोकांना त्याचं गांभीर्य अजूनही कळलेलं नाही. त्यामुळे गृहमंत्रालयानं याची गंभीर दखल घेतली आहे. गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहविभागानं मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनना निर्देश देऊन शहरात नाकाबंदी करण्यास सांगितलं आहे.


योग्य कारण नसताना जे नागरिक बाहेर पडतील किंवा गाड्या घेऊन फिरतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे आदेश गृहमंत्रालयानं दिल्याचं समजतं.



लॉकडाऊनच्या काळात राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. तसंच जिल्ह्याच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन केल्यानंतर अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचं चित्रं सुरुवातीलाच दिसलं. त्यानंतर भाजी मार्केट आणि अन्य ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग करण्यासाठी पावलं उचलण्यात आली. पण काही ठिकाणी लोक विनाकारण फिरताना दिसले तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केल्याचे व्हिडिओदेखिल व्हायरल झाले. त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही आल्या.


मात्र कोरोनाचं संकट खूप मोठं असल्यानं लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करणं गरजेचं बनलं आहे. त्यामुळे पोलिसांना यापुढे आणखी काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश गृहविभागानं दिल्याचं समजतं.