मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. राज्य सरकारने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. सरकारी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती आणि सार्वजनिक वाहतूक कमी करण्याचा निर्णय तसेच बाजापेठेतील दुकानांची वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणे करुन गर्दी कमी होईल. तसेच जिल्ह्या प्रशासनाकडूनही अशीच पाऊल उचलण्यात येत आहेत.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही सूचना केल्या आहेत. प्रत्येकांनी काळजी घेण्याची गरज आहे. आपल्यावर आलेले संकट आपण परतवून लावू शकतो, असा आत्मविश्वासही दिला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राज्यासह देशात करोनाचे रोज नवे रुग्ण वाढत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारांनी करोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. आता राजकीय नेतेही पुढे सरसावत आहेत. राज ठाकरे यांनीही करोनाचा मुकाबला करण्यासाठी मनसे सैनिकांना काही सूचना केल्या आहेत. तसेच राज्यातील नागरिकांनाही दोन आठवडे सांभाळून राहण्याचे, एकमेकांच्या संपर्कात न येण्याचे, गर्दी आणि प्रवास टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे


कोरोनाचा प्रसार होऊ न देण्यात आतापर्यंत आपण यशस्वी झालो आहोत. हा आजार एकमेकांच्या सहवासातून होतो. त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात येणे शक्यतो टाळा. दोन आठवडे हे पथ्य पाळा. आपण करोना रोखण्यात यशस्वी होऊ, असे राज ठाकरे यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे. महाराष्ट्र सैनिकांच्या नावाने त्यांनी हे आवाहन केलं असून त्यासाठी सात सूचनाही केल्या आहेत.


कोरोनाच्या संकटाला कसं तोंड द्यायचं?


आत्तापर्यंत आपण कोरोनाला जास्त फैलावू न देण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोना एकमेकांच्या सहवासातून होतो. म्हणून आपण जर कमी वेळा एकमेकांच्या जवळ गेलो आणि हे सुमारे दोन आठवडे केलं तर हा रोग पसरणार नाही. महाराष्ट्र सैनिकांनी खालील गोष्टी करायला पाहिजेत, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.


१) आपण ज्या भागात रहातो तिथे लोक गोंधळलेल्या अवस्थेत असू शकतात. तिथे त्यांना दिलासा द्यायला पाहिजे. तिथे माहितीची कमी असेल, साधन-सोयींची कमतरता असेल तर योग्य ते करावे.


२) आपल्या शाखा-शाखांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये आपण एका वेळी गर्दी होणार नाही असे पहावे. ती थोडी नियंत्रित करून, काहींना वेग-वेगळ्या वेळा देऊन गर्दी आटोक्यात आणावी. आपल्यामध्ये तीन फुटांचे अंतर राखावे.


३) आपल्या भागात जर कुणी सर्दी, तापानं आजारी असेल तर त्यांना धीर देऊन तपासणी करून घ्यायला सांगावे. त्यासाठी कुठलीही जोर-जबरदस्ती करू नये. त्यांचं मन तयार करावं आणि त्यांना आपल्या भागातील आरोग्य खात्याच्या कर्मचारी वर्गाशी भेट घालून द्यावी.


४) आपल्या भागात असे कुणी रूग्ण आढळल्यास प्रशासनाच्या किंवा आरोग्य खात्याच्या योग्य व्यक्तिंशी संपर्क राखून त्यांच्या देखरेखीखाली त्यांचे उपचार करावेत. आपली भूमिका ही आरोग्य खात्याला सहकार्याचीच असावी. संघर्षाची नव्हे.


५) आपल्या भागात जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा असल्यास तशी माहिती योग्य यंत्रणेला द्यावी. दुकानांमध्ये माल आहे की नाही ते पहावे. कुणी काळाबाजार करत असेल तर त्याची माहिती शासनाला द्यावी आणि लक्ष ठेवावे.


६) ज्यांचं हातावर पोट आहे अशी माणसं आपल्या भागात असतील. ती कोण आहेत ती शोधून त्यांची खाण्याची सोय नसेल तर ती करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या भागात काही जेष्ठ नागरिक, अपंग, इतर रूग्ण असतील तर त्यांना काही मदत लागल्यास ती देण्याचा प्रयत्न करावा.


७) महिला सेनेनी घराघरात जाऊन महिलांच्या आरोग्यविषयक किंवा काही अडचणी असतील तर त्या ऐकाव्यात. महिला सर्वसाधारणपणे बोलत नाहीत. त्यांचं ऐकावं आणि योग्य ती मदत करावी.


८) सोशल मीडियाचा योग्य आणि कल्पक वापर करण्याची हीच ती वेळ. अफवा खोडून काढा. तुमच्या विभागातील नागरिकांशी संपर्कात राहा. शासकीय-प्रशासकीय यंत्रणेकडून येणारी योग्य माहिती जनतेपर्यंत इत्यंभूत पोहचेल ह्याची काळजी घ्या.


९) आणि हो, ह्या सगळ्यात तुम्ही तुमची, तुमच्या कुटुंबीयांची देखील काळजी घ्या. बाहेर जाताना मास्क लावा, 'सॅनिटायझर'ने हात स्वच्छ करत रहा आणि तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना कोणताही संसर्ग होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुमचं आयुष्य हे माझ्यासाठी, आपल्या पक्षासाठी मोलाचं आहे हे विसरू नका.