अन्यथा `या` सेवांवर येणार बंधनं; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इशारा
कोणत्या गोष्टींवर येणार बंधनं?
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सातत्यानं कोरोना परिस्थितीचा आढावा घेत काही महत्त्वाचे मुद्दे प्रकाशझोतात आणले. ज्यानंतर त्यांनी कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता चिंताही व्यक्त केली. बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना टोपे यांनी महत्त्वपूर्ण इशारा देत नागरिकांना सतर्क केलं. (Corona)
राज्यात सध्या रुग्णसंख्या ज्या वेगानं वाढत आहे, ते पाहता तीन दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण दुपटीनं वाढत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आल्याचं त्यांनी सांगितलं.
याच पार्श्वभूमीवर सध्या नागरिकांमध्ये लॉकडाऊनची भीती पाहायला मिळत आहे. याबाबतचं चित्र राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
येत्या काळा लॉकडाऊनचा उल्लेखही नको असा सूर आळवला. किंबहुना सध्या त्याची गरज नाही असं वक्तव्यही त्यांनी केलं.
त्याच वेळी त्यांनी एक मुख्य मुद्दा अधोरेखित केला. टास्क फोर्सनं ऑग्युमेंटेड रेस्ट्रीक्शन्सचा मुद्दा समोर ठेवल्याचं त्यांनी सांगितलं.
ऑग्युमेंटेड रेस्ट्रीक्शन्स म्हणजे नेमकं काय?
सध्याच्या परिस्थितीला अनुसरून या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिलं.
ज्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा-सुविधांची फारशी आवश्यकता नाही, अत्यावश्यक सेवांमध्ये ज्याची गणती केली जात नाही अशा पद्धतीच्या सेवा, सुविधा आणि प्रक्रिया धीम्या गतीनं करण्याच्या किंवा त्या थांबवण्यासाठी पावलं उचलली जाऊ शकतात असा इशारा त्यांनी दिला.
ज्या ठिकाणी गर्दी होत आहे त्या ठिकाणी कठोर नियम लावण्याची गरज असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.
सर्व परिस्थिती, रोजची वाढती रुग्णसंख्या आणि सर्व मुद्दे मुख्यमंत्र्यांपुढे सादर करण्यात येतील ज्यानंतर त्यांच्या परवानगीनंतरच हे सर्व निर्णय घेतले जातील असं राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान, अत्यावश्यक या वर्गात न मोडणाऱ्या सुविधांमध्ये उद्यानं, मॉल, सलून- पार्लर, शिकवणी वर्ग, अत्यावश्यक वस्तू वगळता इतर वस्तूंची दुकानं आणि महत्त्वाच्या कारणाव्यतिरिक्त करण्यात आलेला प्रवास या साऱ्याचा समावेश आहे.
परिणामी येत्या काही दिवसांत याबाबतीत राज्य शासन गंभीर निर्णय घेणार ही बाब नाकारता येणार नाही.