Coronavirus Updates : मुंबईत पुन्हा जम्बो कोरोना केंद्र सुरु होणार, दुबई आणि चीनमधून येणाऱ्यांची चाचणी
Coronavirus in Mumbai : मुंबईत कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर टास्कफोर्सने शुक्रवारी आढावा बैठक घेतली. गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय आणि आणखी एका ठिकाणी जम्बो करोना केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.
Coronavirus in Mumbai : कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर मुंबईत कोरोना रूग्णसंख्येत होत असलेली वाढ लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या तयारीचा वेग वाढवला आहे. महानगरपालिकेने शहरातील दोन रुग्णालयांसह तीन ठिकाणी जम्बो कोरोना केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तर परदेशातून येणाऱ्यांची चाचणीही केली जाणार आहे.
तीन ठिकाणी जम्बो कोरोना केंद्र
मुंबईत कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर टास्कफोर्सने शुक्रवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्व रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. या धरतीवर मुंबई महापालिकेने आढावा बैठक घेतली. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय आणि आणखी एका ठिकाणी जम्बो करोना केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.
रुग्णालयात मास्कचा वापर बंधनकारक
तसेच मुंबईत दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येण्याच्या दरात 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी राज्यामध्ये 425 नवे रुग्ण सापडले. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3090 वर पोहोचली आहे. डॉक्टर, कर्मचारी यांच्यासह रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना रुग्णालयामध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यातील रुग्ण पॉझिटिव्ह रेट चार आठवड्यांपूर्वी 1.5 टक्के इतका होता. तर, गेल्या आठवड्यादरम्यान तो 6.15 टक्के झालाय. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई जवळील वसईत कोरोनाचे रुग्ण सापडले आहे. तर सोलापूरमध्ये सर्वाधिक रुग्ण पॉझिटिव्ह रेट 20.5 टक्के, सांगली 17.47 टक्के, कोल्हापूर 15.35 टक्के, पुणे 12.33 टक्के, नाशिक 7.84 टक्के आणि अहमदनगर 7.56 टक्के इतका आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली असून खबरदारीचे उपाय घेण्याच्या सूचना आरोग्या विभागाकडून करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सध्या राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये 98 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 1 जानेवारीपासून आतापर्यंत इन्फ्ल्युएंझाचे 3 लाख 58 हजार 73 संशयित रुग्ण सापडले असून त्यांना ऑसेलटॅमीवीर हे औषध देण्यात आले आहे. यामध्ये ‘एच 1 एन 1’चे 451तर ‘एच 3 एन 2’चे 358 रुग्ण आढळून आले आहेत.