कोरोना : राज्यातील चार जिल्ह्यांत १४ दिवसांपासून एकही नवीन रुग्ण नाही
कोरोनाचे संकट असताना एक दिलासा देणारी बातमी हाती आली आहे.
मुंबई : कोरोनाचे संकट असताना एक दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. राज्यातल्या लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात गेल्या १४ दिवसांपासून एकही नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. देशात असे एकूण ६१ जिल्हे असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
राज्यात काल आणखी ५५२ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यातला एकूण रुग्णांचा आकडा ५ हजार २१८ झाला आहे. यापैकी ७७२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ७ हजार ८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
तर मुंबई महानगर क्षेत्रातल्या या विषाणू संसर्गाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या चार हजाराच्या घरात पोहोचली आहे. या आजारानं राज्यात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १२, पुण्यातील ३, ठाणे मनपामधील २ तर सांगली येथील १ आणि पिंपरी चिंचवड येथील १ रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १० पुरुष तर ९ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे.
या १९ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मुंबईतल्या प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या गेल्या १० दिवसात ४३२ ने वाढली आहे. सध्या मुंबईत सुमारे ८१३ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. यापैकी सर्वाधिक ८२ क्षेत्र ही हाजी अली ते वरळी या भागात असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
देशात गेल्या २४ तासात कोविड १९ मुळे ४७ जणांचा मृत्यू झाला, तर १ हजार ३३६ नवे रुग्ण आढळले. देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८ हजार६०१ झाली असून ५९० रुग्ण मरण पावले.
या आजारातून देशातले एकूण ३ हजार २५२ रुग्ण बरे झाले असून सोमवारी दिवसभरात तब्बल ७५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण साडे सतरा टक्के असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.
दरम्यान, रक्ताची गरज असलेल्या व्यक्तींसाठी केंद्र सरकारने हेल्पलाइन सुरू केली आहे. या व्यक्ती ९३-१९-९८-२१-०४, ९३-१९-९८-२१-०५ या क्रमांकावर रक्ताची गरज नोंदवू शकता. रक्तदान करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनीही या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.