सुमीत बागुल, झी मीडिया, मुंबई : गुन्हेगार आपला गुन्हा कायम लपून राहावा यासाठी प्रचंड होमवर्क करतो. पण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एकतरी पुरावा मागेच ठेवतोच. असंच काहीसं झालं मुंबईतील सुटकेस मर्डर कांडमध्ये. आरोपीने पुरावे लपवण्यासाठी पूर्ण विचार करुन जबरदस्त योजना आखली. पण पोलिसांना एक पुरावा सापडला तो पुरावाच आरोपीला शिक्षेपर्यंत पोहचवण्यास पुरेसा ठरला.
 
ही मर्डर मिस्ट्री सोडवताना पोलिसांना जेवढं बुचकळ्यात टाकलं, त्यापेक्षाही कित्येक पटीने जास्त मिस्ट्री सोडवल्यानंतर पोलीस चकित झाले. चेहऱ्यावरुन निष्पाप दिसणारी व्यक्ती एवढी निर्दयी कशी होऊ शकते हे पाहून पोलीसही चकित झाले. ही बातमी आहे मायानगरी मुंबईतील सर्वात मोठ्या सस्पेन्स आणि मर्डर मिस्ट्रीबाबत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसर्गरम्य माहीम बीचवर मिळाली सुटकेस, ज्यात होते कापलेले हात पाय...
तारीख 2 डिसेंबर 2019, मुंबईतील माहीम बीचवर सकाळी फेरफटका मारायला अनेक जण येत असतात. मनमोहक समुद्रकिनारी फिरून आपल्या दिवसाची सुरवात होते. असाच तो ही दिवस होता. सकाळी फिरणाऱ्यांना समुद्रातून एक बॅग तरंगत किनाऱ्यावर येताना त्यांना दिसली. ही बॅग किनाऱ्यावर येताच तिथल्या तटरक्षक दलाने पोलिसांना तात्काळ माहिती दिली. 


पोलिसांनी ती बॅग उघडली आणि उपस्थितांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या बॅगेत होते कापलेला एक हात आणि एक पाय. या बॅगेत शरीराचा कोणताही हिस्सा नव्हता. चकित करणारी बाब म्हणजे यामध्ये डावा पाय आणि उजवा हात होता. या हातापायावरून हे एका पुरुषाचे अवयव असल्याचं समजत होतं.


पोलिसांनी फिरवली सूत्र आणि आणि सुरु झाला तपास...
बॅगेत मिळालेल्या अवयवांनंतर पोलीस ऍक्शनमोडवर आले. पोलिसांनी तात्काळ काही मच्छिमारांना बोलावून तपासाला सुरुवात केली. एक हात आणि एक पाय सापडल्यानंतर पोलिसांना शंका होती की शरीराचे इतर अवयव देखील आसपास कुठेतरी असतीलच. मच्छीमारांनीही प्रचंड शोधाशोध केली, मात्र त्यांच्या हातात निराशेशिवाय काहीही आलं नाही. 


अखेर पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली आणि अवयव फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले. दरम्यान पोलिसांनी आसपासच्या परिसरातील CCTV देखील तपासले. मात्र पोलिसांना काहीही सापडलं नाही. पोलिसांना काहीही ठोस सुगावा सापडला नसल्याने अखेर पोलिसांनी ती केस क्राईम ब्रांचकडे सुपूर्द केली.


शर्टावरील अक्षरं आणि फेसबुकवरून मिळाला पुरावा, पण...
मुंबई क्राईम ब्रांचने पुन्हा तपासाला सुरवात केली. ज्या ठिकाणी बॅग आणि बॅगेतील कापलेले हात पाय मिळाले तिथे तपास केला. कापलेल्या हात पायांमधून रक्त्त टिपलं जावं म्हणून बॅगेत काही कपडे होते. ज्यामध्ये एक शर्ट, एक लाल रंगाचं स्वेटर आणि एक पॅन्ट होती. या कपड्यांचा बारकाव्याने तपास करताना पोलिसांची त्या शर्टावर नजर गेली. या शर्टावर अल्मो मेन्स वेअर (Almo Men’s Wear) असा टॅग लावलेला. हा शर्ट टेलरकडून शिवलेला असल्याने पोलिसांनी त्या टेलरच्या शोध घेतला. शेवटी पोलिसांना ते दुकान मिळालं. हे दुकान होतं मुंबईतील कुर्ला भागात बेलगामी रोडवर.  


त्या रक्तरंजित बॅगेतील शर्ट कुणाचा, झालं उघड...
पोलीस दुकानात पोहोचले, शर्ट टेलरला दाखवला, दुकानदाराकडून बिलाची मागणीही केली. टेलर जेंव्हा एखादा शर्ट शिवतो तेंव्हा त्या कापडाचे लहान तुकडे बिलावर कापून लावतो. पोलिसांच्या सांगण्यावरून टेलरने बराच वेळ तपास केला आणि अखेर टेलरला ते बिल मिळालंच. हा शर्ट बेनेट रेबेलोने शिवून घेतलेला. मात्र या बिलावर ना फोन नंबर ना कोणताही पत्ता. त्यामुळे हा बेनेट नक्की आहे तरी कोण, याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती मिळत नव्हती. मात्र पोलिसांचा तपास थांबला नाही.
 
फेसबुकवर मिळाला लाल स्वेटरबाबतचा मोठा पुरावा...  
पोलिसांना नाव तर समजलं होतं, मात्र बेनेट नामक व्यक्ती कोण हे शोधण्यासाठी पोलिसांनी फेसबुकवर शोधाशोध सुरु केली. बेनेट रेबेलो नामक अनेक युजर्स फेसबुकवर होते. पोलिसांनी एक एक करून सर्व प्रोफाईल्स चेक केलेत. या डझनभर प्रोफाईल्सपैकी एका प्रोफाईलवर पोलिसांची वारंवार नजर खिळत होती. पोलिसांनी ते प्रोफाइल वारंवार पाहिलं. यामध्ये अपलोड केलेले पोस्ट वारंवार तपासले आणि त्यातच त्यांना मिळाला एक सुगावा. एका फोटोत त्या व्यक्तीने अगदी तशाच पद्धतीचे कपडे घातलेले जे पोलिसांना बॅगेतून मिळाले होते.


फेसबुकवरुन मृत व्यक्तीचा लावला शोध
पोलिसांना फेसबुकवर सापडलेला इसम बेनेट रेबेलोच होता. पेश्याने तो एक म्युझिशिअन होता. आता पोलिसांना फेसबुकवर आणखी एक मोठा पुरावा मिळाला तो म्हणजे त्याने टाकलेलं एक आयडी कार्ड. या आयडीवर याच बेनेटने तो एका पार्टीचा कार्यकर्ता असल्यातच दावा करत आपला पत्ता आणि नंबर देखील टाकला होता. 


पोलिसांनी त्या नंबरवर फोन केला, मात्र फोन बंद आला. फोन बंद आल्यावर पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्या पोस्टवरील पत्त्यावर देखील पोलिसांनी हजेरी लावली. हा पत्ता होता सांताक्रुज कालिना व्हिलेजचा. पोलीस पत्त्यावर पोहोचले, मात्र तिथेही कुलूप होतं. पोलिसांना जशा अडचणींचा सामना करावा लागत होता त्यावरून एक गोष्ट तर पक्की होती की पोलीस गुन्हेगाराच्या अत्यंत जवळ पोहोचेलत.


पोलिसांनी आसपासच्या घरांमध्ये चौकशी केली. बेनेट रेबेलो अनेक दिवसांपासून गायब असल्याचं त्यांना समजलं. बेनेट रेबेलो सोबत त्यांची मुलगीही राहत असल्याचं चौकशीत पोलिसांना समजलं. मात्र तीही गायबच होती. अधिक चौकशी केल्यावर त्यांची मुलगी ही दत्तक मुलगी असल्याचं समोर आलं. तिचं नाव आराध्य पाटील उर्फ रिया बेनेट रेबेलो असं होतं. रियाचं वय साधारण 19 वर्ष होतं.  


आता पोलिसांनी त्या मुलीचा शोधही सुरु केला. कायदेशीर तपासासाठी पोलिसांनी बेनेटच्या घराचं कुलूप तोडून आतमध्ये तपास सुरु केला. बराच वेळ तपास केल्यानांतर पोलिसांना एक वही मिळाली. या वहीत जे लिहिलं होतं ते वाचून पोलिसांना मोठा धक्का बसला.


कागदाच्या तुकड्यांवर लिहिलेलं असं काही की...
Dad, I am sorry, really really sorry, god sorry Dad, sorry for you, I am a bad girl...  ज्यांनी मला राहायला घर दिल त्यांनाच मी मारून टाकलं. ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं त्यांनाच मी मारून टाकलं. sorry for that, sorry, sorry, sorry”...


दरम्यान, तपास करताना पोलिसांना रियाच्या मोबाईल नंबरवरून तिचं लोकेशन समजलं. हे लोकेशन होतं मुंबईतील घाटकोपर भागातील. पोलीस तपास करत थेट रियाच्या घरी धडकले. पोलिसांना घरी आलेलं पाहून रिया काहीशी बिथरली. मात्र बेनेट रिबेलोबाबत चौकशी करताना सुरुवातीला ते देशाबाहेर गेल्याच रिया सांगत होती. पोलिसांनी रियाला कागदाच्या तुकड्यांवर लिहिलेला तो मेसेज दाखवला. रियाला समजून चुकलेलं की तिचा खेळ खल्लास झालाय.


रियाने दिली खूनाची कबुली
रियाने घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर उघड केला. बेनेट सुरुवातीला चांगला होता. मात्र नंतर जसजसे दिवस पुढे गेलेत, बेनेट माझ्यावर लैंगिक अत्याचार करायला लागला. याबाबत एका मित्राला सांगितल्यावर त्याला प्रचंड राग आला आणि त्यानंतर बेनेटचा काटा काढायचा कट रचला गेला.


मित्राच्या मदतीने आखला हत्येचा कट
रियाने पोलिसांना सांगितलं की तिने आणि तिच्या मित्राने 23 नोव्हेंबर 2019 रोजी बेनेटला मारण्याचा कट रचला. मात्र त्यादिवशी ते तसं करू शकते नाहीत. त्यानंतर  26 नोव्हेंबर 2019 च्या संध्याकाळी तिचा मित्र आधीच घरी आलेला. मित्राने रियाच्या मनात बेनेटबाबत जे भरवलेलं त्यामुळे रिया प्रचंड चिडलेली. बेनेट घरी येताच तिने भांडणाला सुरवात केली. 


बेनेटच्या कानाखाली मारली आणि बेनेटला जाब विचारायला सुरुवात केली. रिया वारंवार विचारात होती  कि तू एका बापासारखा का वागत नाहीस? बेनेटलाही समजलं की रियाच्या मित्राने रियाच्या मनात जे विष कालावलंय त्यावरूनच रिया आपल्याशी भांडण करतेय. भांडण वाढलं. बेनेटने बाजूची एक गिटार उचलून रियाच्या मित्राला मारण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा रियाने बेनेटच्या डोक्यात एका काठीने वार केला. दोघांनीही बेनेटला बेशुद्ध होईपर्यंत मारलं.


बेनेट बेशुद्ध झाला पण मेला नव्हता, म्हणून दोघेही बेनेटला किचनमध्ये घेऊन गेलेत. तिथे त्यांना बेनेटचा श्वास सुरु असल्याचं समजलं. त्यानंतर बेनेटच्या तोंडात मच्छर मारायचा संपूर्ण स्प्रे रिकामा केला. यानंतर चाकूने मारून बेनेटला संपवलं.


बेनेटची हत्या केल्यानंतर...
बेनेटची हत्या केल्यांनतर त्यांनी बेनेटचं मृत शरीर बाथरूममध्ये नेलं आणि रात्रभर रक्त वाहून जाऊ दिलं. हत्येनंतर  27 नोव्हेंबर 2019 रोजी बाजारातून चार चाकू घेऊन आलेत. याच चाकूने त्यांनी बेनेटच्या मृतदेहाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला. मात्र चाकूने मृतदेह कापला जात नव्हता. म्हणून त्यांनी चाकू गरम करून शरीराचे तुकडे करण्यास सुरवात केली. 


हातोड्याने शरीरातील हाडं तोडलीत. त्यानंतर बाजारातून एक मोठी बॅग आणि काही पॉलिथिनच्या बॅगा आणल्या. त्यांनी त्या सुटकेसमध्ये बेनेटचा एक हात, एक पाय आणि प्रायव्हेट पार्ट टाकले . या अवयवांमधून अजूनही रक्त येत होतं म्हणू त्यांनी सुटकेसमध्ये बेनेटचा एक शर्ट, पॅन्ट आणि एक स्वेटर टाकलं. यामुळे रक्त सुकेल आणि तोडलेले अवयवही दिसणार नाही. बाकीचे अवयव डबल पॉलिथिन बॅगेत टाकून जवळच्या मिठी नदीत टाकले.  


सुटकेस आणि पॉलिथिन बॅग वेगवेगळ्या वेळेत मिठी नदीत टाकण्यात आल्याचं पोलिसांना तपासात समजलं. सुटकेस ही मिठी नदीतून वाहत सुमद्रात गेली. माहीम दर्ग्याजवळच्या माहीम बीचवर ही सुटकेस वाहत आली आणि पोलिसांना  2 डिसेंबर 2019 रोजी ती सापडली.


रियाचा मित्र अवघ्या सोळा वर्षांचा होता, पोलिसांनी त्याला बालसुधार गृहात टाकलं. रियालाही जेलमध्ये टाकण्यात आलं. रिया आणि तिच्या मित्राने शर्ट, पॅन्ट आणि लाल स्वेटरजर बॅगेत टाकलं नसतं तर कदाचित ही मर्डर मिस्ट्री एक मिस्ट्री म्हणूनच राहिली असती.