राष्ट्रवादीच्या `लेडी डॉन`ची गुंडगिरी; मारहाण करत जबरदस्तीने दुकान रिकामे करण्याचा प्रयत्न
Ulhasnagar Crime : गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आहे. एकीकडे गॅंगवॉरच्या घटना घडत असताना दुसरीकडे महिलांचीही गुंडगिरी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याने गुंडगिरी करत एक दुकान रिकामे करण्याचा प्रयत्न केलाय.
चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : उल्हासनगर (Ulhasnagar Crime) शहरात महिलांचा गुंडाराज असल्याचे चित्र समोर आलं आहे. काही महिलांनी दिवसाढवळ्या दुकानात घुसत दुकानदाराला मारहाण केल्याचा प्रकार पवई चौकात घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिला गुंडांनी मारहाणीनंतर दुकानही रिकामे करण्याचा प्रयत्न केला आहे. आता याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी (Ulhasnagar Police) दादागिरी करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतलं आहे.
उल्हसनगर कॅम्प नंबर तीनच्या पवई चौकात सतीश शाहा यांच्या मालकीच्या गाळ्यात कृष्णाप्रसाद वर्मा हे 2018 पासून भाडेतत्त्वावर आहेत. शुक्रवारी सकाळी अचानक पाच ते सात महिला आणि पुरुषांनी कृष्णाप्रसाद वर्मा यांच्या दुकानात बेकायदेशीर शिरून त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी दुकानात लावलेला सीसीटीव्हीचा डिव्हीआर देखील तोडफोड करून पळवून नेला. त्यानंतर या महिलांनी जबरदस्ती दुकान रिकामे करत ताबा घेण्याचा प्रयत्न केला. तसेच दुकानातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त करून दमदाटी करत मारहाण केल्याचे समोर आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांनी तात्काळ दुकानात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या धनी आवळे या महिलेसहित नीता शाहा, माला शाहा, अनुसया भोईर, आशा सोनवणे, भाग्यश्री भोईर आणि इतर तीन इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस याप्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान उल्हासनगर शहरात दिवसाढवळ्या अशा प्रकारे दुकान खाली करण्यासाठी महिलांना पुढे करून गुंडाराज करणाऱ्या महिलांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी व्यापारी करत आहेत.
उल्हासनगरात तरुणावर जीवघेणा हल्ला
उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सात ते आठ जणांच्या टोळीने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृगण उर्फ विशाल नाडर असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृगण हा उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात इडली वडा विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचा मित्र बाबू वहिनी आणि मृगण हे घराच्या दिशेने येत असताना स्टेशन परिसरात सात ते आठ जणांच्या टोळीने त्यांच्यावर तलवार, रॉडच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मृगण हा जखमी झाला तर बाबू वहिणी हा तरुण पळून गेल्याने थोडक्यात बचावला आहे. बाबूच्या हत्याचा कट रचण्यात आला होता पण बाबू हातातून निसटल्याने मृगण याच्यावर हल्ला झाल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जिवेठार मारण्याच्या गुन्हात आरोपी अजय ,कुबड्या,गण्या,आणि चेतन यांना अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. दिवसेंदिवस उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात गँगवार होत असल्याने पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले आहे.