मुलगा हवा म्हणून चक्क 4 वर्षांच्या मुलाचं केलं अपहरण; कल्यामधील अपहरणामागील साबण कनेक्शन चर्चेत
Kalyan Crime : कल्याण रेल्वे स्थानकावरुन एका मुलाचे अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तात्काळ आरोपीला अटक करुन मुलाला सुखरुप पालकांच्या ताब्यात दिलं आहे.
आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : कल्याण (Kalyan) रेल्वे स्थानकावरील वेटिंग रूममधून सकाळच्या सुमारास चार वर्षाच्या मुलाचं एका इसमाने अपहरण केलं होतं. याप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने (Kalyan Railway Crime Branch) तपास करत अवघ्या आठ तासात बेपत्ता मुलाचा शोध घेत त्याला त्याच्या आई-वडिलांच्या हाती सोपवलं आहे. पोलिसांनी अपहरणकर्ता कचरू वाघमारे याला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कचरू वाघमारे याला चार मुली आहेत. मुलाच्या हव्यासापोटी त्याने या चिमुकल्याचे अपहरण केल्याचं तपासात समोर आले आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे करण गुप्ता व त्याची पत्नी शुभांगी गुप्ता हे दोघे मजुरीचे कामं करतात. त्यांना दोन वर्षाची मुलगी कीर्ती व चार महिन्याचा अथर्व ही दोन मुलं आहेत. सोमवारी सकाळी कपडे धुण्यासाठी ते कल्याण रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूम मध्ये आले होते. मात्र साबण नसल्याने आपल्या दोन्ही मुलांना बाहेर खेळायला सोडून ते साबण घेण्यासाठी स्टेशन बाहेर आले. यावेळी त्यांच्या मुलांसोबत आणखी चार मुली त्या ठिकाणी खेळत होत्या. मुले खेळत असलेल्या ठिकाणी एक जोडपं देखील होतं. गुप्ता दाम्पत्य आमच्या मुलांवर लक्ष ठेवा असे त्या दाम्पत्याला सांगून साबण आणण्यासाठी बाहेर गेले.
साबण घेऊन परतल्यानंतर मात्र त्यांना धक्काच बसला. स्टेशनवर येऊन पाहिले असता अथर्वसोबत खेळत असलेल्या चारही मुली तिथे नव्हत्या. करण गुप्ताने आजूबाजूला आपल्या मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्याला मुलगा कुठेही आढळून आला नाही. अखेर करण गुप्ताने कल्याण रेल्वे गुन्हे पोलीस ठाणे गाठले. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तात्काळ या मुलाचा शोध सुरू केला. पोलिसांनी स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली तसेच मुलाच्या शोधासाठी पथके नेमली.
सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास एक इसम अथर्वला घेऊन कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर आढळून आला. हा इसम नाशिकला जाणारी ट्रेन पकडण्याच्या घाईत होता. रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने या इसमावर झडप घालत त्याला ताब्यात घेतलं व मुलाची सुटका केली. चौकशी दरम्यान या इसमाचे नाव कचरू वाघमारे असल्याचे समोर आलं. कचरू वाघमारे याला चार मुली होत्या. त्याला मुलगा हवा होता. मुलाच्या हव्यासापोटी त्याने चार वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण केल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी कचरूला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.