दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : एकीकडे शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा केला आहे. 


नगरविकास विभागाने अखेर परवानगी दिली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलानगर इथे मातोश्रीसमोर उभ्या राहणाऱ्या आलिशान आणि आठ मजली मातोश्री दोनच्या वाढीव बांधकामाला मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास विभागाने अखेर परवानगी दिली आहे. 


मातोश्री दोनच्या अतिरिक्त बांधकामासाठी परळ येथील एका एसआरए प्रकल्पाचा टीडीआर विकत घेण्यात आला होता. मात्र हा टीडीआर नियमानुसार मातोश्री दोनसाठी वापरता येणार नाही, असा शेरा देत मुंबई महापालिकेने हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडील नगरविकास विभागाकडे 16 सप्टेंबर रोजी पाठवले होते. 


मातोश्री दोनच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा


अखेर या प्रस्तावाला मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी देऊन उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री दोनच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा केला आहे. आठ मजली असलेल्या मातोश्री दोनच्या सहा मजल्यांचे काम पूर्ण झाले होते, आता मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यामुळे रखडलेल्या दोन मजल्यांचे कामही मार्गी लागणार आहे. 


कलानगर इथे मातोश्रीसमोर साकारणाऱ्या मातोश्री दोन इमारतीचे बांधकाम अडचणीत आले होते. उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील या मातोश्री दोनच्या बांधकामासाठी टीडीआर वापरण्यास शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेनेच नकार दिला होता. महापालिकेने आता मातोश्री दोनचा हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठवला होता. नगरविकास खाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती मातोश्री दोनच्या अतिरिक्त बांधकामाचे भवितव्य अवलंबून होते.


शिवसैनिकांच्या मनात मातोश्रीबद्दल आदराची भावना


बाळासाहेब ठाकरे यांच्या वास्तव्यामुळे कलानगर इथला मातोश्री बंगला हा राज्यातील एक बळकट सत्ताकेंद्र म्हणून ओळखला जातो. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनंतर याच मातोश्रीवरून शिवसेनेची वाटचाल सुरू ठेवली. आजही शिवसैनिकांच्या मनात मातोश्रीबद्दल आदराची भावना आहे. 


ठाकरेंच्या वाढणाऱ्या कुटुंबाला मातोश्री कमी पडत असल्याने, मातोश्रीसमोरच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या नावावर 5200 चौरस फुटाचा बंगला विकत घेतला. हा बंगला पाडून या ठिकाणी आठ मजली इमारत उभी करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मातोश्री दोनचे कामही सुरू झाले. मुंबई महापालिकेकडून सहा मजल्यांना सीसीही देण्यात आली आहे.


झी 24 तासला मिळालेल्या कागदपत्रांनुसार


या अतिरिक्त दोन मजल्यांना परवानगी मिळावी म्हणून, मे 2017 रोजी परळ येथील एका एसआरए प्रकल्पाचा टीडीआर विकत घेण्यात आला. मात्र हा 2600 चौरस फुटाचा टीडीआर नियमानुसार मातोश्री दोनसाठी वापरता येणार नाही, असा शेरा देत मुंबई महापालिकेने हे प्रकरण आता स्पष्टीकरणासाठी नगरविकास विभाग म्हणजेच मुख्यमंत्र्यांकडे 16 सप्टेंबर रोजी पाठवले आहे. 


2600 चौरस फुटाचा टीडीआर मिळेल हे गृहित धरून मातोश्री दोनसाठी उद्धव ठाकरे यांच्यामार्फत महापालिकेकडे जो प्रस्ताव सादर करण्यात आलाय, त्यात दोन ट्रीप्लेक्स अपार्टमेंट बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून एकूण 10 हजार 500 चौरस फुटाचं बांधकाम प्रस्तावित आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये मातोश्री दोनच्या बांधकामास सुरुवात झाली आहेत, सहा मजले बांधून पूर्ण झाले आहेत, तर उर्वरित दोन मजले आता नियमांच्या कचाट्यात अडकले  होते.