मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, कोरोनाचे आव्हान अजून संपलेले नाही. त्यामुळे ब्रेक दी चेनमध्ये जे निकष आणि पाच लेवल ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. तसेच कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रेक दी चेनच्या निर्बंधात 4 जूनच्या आदेशानंतर राज्यभरात निर्बंध शिथिल झाले असल्याचा समज निर्माण झाला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आणि पोलीस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा असेही स्पष्ट केले आहे.


गेल्या वर्षी विविध सण आणि उत्सवानंतर कोरोनाचा संसर्ग वाढला होता, यावेळेस ही दुसरी लाट सणांच्या आधीच आली. दुसकरीकडे म्युटेशन विषाणूमुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून यापासून अधिक सावध राहण्याची गरज आहे नाहीतर तिसऱ्या लाटेत मोठे आव्हान उभे राहील असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.


मुख्यमंत्री म्हणाले की, 'रुग्ण संख्या कमी करण्यात आपल्याला यश येत असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पावसाळ्यात आपापल्या भागातील नदी व धरणातील पाणी साठ्यावर लक्ष ठेवून असतो व विशिष्ट रेषेच्या वर पाणी पातळी वाढली तर लगेचच नागरिकांचे स्थलांतर किंवा इतर पाउले उचलतो अगदी त्याचप्रमाणे कोरोनासाठी निर्बंध लावायचे किंवा नाही याकरिता या पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत.'


संसर्ग किती वाढेल याविषयी मनात शंका असतील तर व्यवहारांवर निर्बंध घाल, कुठल्याही दबावाला बळी पडू नका असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.