सर्वसामान्यांच्या खिशाला चटका, वडापावपाठोपाठ कटिंग चहाही महागला
घराघरांतला आणि टपरीवरचाही चहा महागला, इतक्या रुपयांची झाली वाढ
मुंबई : श्रीमंतांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचं आवडतं पेय म्हणज चहा. चहाप्रेमी सापडणार नाही असं क्वचितच असेल. पण आता या चहाप्रेमींच्या खिशाला चटका बसणार आहे. कारण तुमच्या आमच्या आवडीचा चहा महागणार आहे.
गॅस, दूध महागल्यानं चहाच्या किमतीही वाढवण्याचा निर्णय टी अँड कॉफी असोसिएशननं घेतलाय. चहाची गुणवत्ता ढासळू नये म्हणून चहाच्या किमती 1 ते 2 रुपयांनी वाढवल्या जाणार आहेत. 10 रुपयाला मिळणारा चहा आता 12 रुपयाला तर काही ठिकाणी 8 रुपयाला मिळणारा चहा आता 10 रुपयांना मिळणार आहे.
मागील काही दिवसांपासून महागाई वाढत आहे. त्याची झळ आता सर्वसामान्यांना बसू लागली आहे. दूध दरवाढीनंतर चहाचा दर वाढवण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच दूधाच्या दरात दोन ते तीन रुपये प्रति लिटर इतकी दरवाढ करण्यात आली होती. त्याशिवाय चहासाठी आवश्यक असणाऱ्या इतर वस्तूंच्या दरात वाढ होत असल्याने चहा विक्रेत्यांना आर्थिक गणित जमवणं अधिक कठीण होत होते. त्यानंतर चहा विक्रेत्यांची संघटना असलेल्या टी अँड कॉफी असोसिएशनच्यावतीने चहाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे साधारणपणे 10 रुपयांना मिळणारा कटिंग चहा आता 12 रुपयांना तर 8 रुपयांना मिळणार कटिंग चहा 10 रुपयांना मिळणार आहे.
दूध दरात वाढ
वीज, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि चारा यांच्या वाढत्या किंमतीमुळे दूध उत्पादक महासंघ, कंपन्यांनी दूधाच्या दरात वाढ केली आहे. प्रति लिटर दूधामागे तीन रुपयांची वाढ करण्यात आली.