निसर्ग चक्रीवादळ । येत्या सहा तासात गंभीर स्वरुप धारण करणार, हवामान विभागाचा इशारा
निसर्ग या चक्रीवादळाचा वेग वाढला असून ताशी १३ किमी वेगाने चक्रीवादळाचा किनाऱ्याच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे.
मुंबई : निसर्ग या चक्रीवादळाचा वेग वाढला असून ताशी १३ किमी वेगाने चक्रीवादळाचा किनाऱ्याच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. पुढील सहा तासात अलिबागच्या किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता, सध्या निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या किनाऱ्यापासून १५५ किमी अंतरावर तर मुंबईपासून दक्षिण दिशेला २०० किलोमीटर आहे.
काल दुपारी मुंबईपासून ३८० किलोमीटर अंतरावर असलेलं चक्रीवादळ येत्या ६ तासात गंभीर स्वरुप धारण करेल असा भारतीय हवामान विभागाने इशारा दिला आहे. येत्या काही तासात निसर्ग चक्रीवादळ गंभीर स्वरुप धारण करुन महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवरुन जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दुपारी गोव्यातील पणजीपासून २९० किलोमीटर होते. ते आता पुढे सरकले आहे. काल मुंबईपासून ३८० किलोमीटर अंतरावर हे वादळ होते. आता ते पुढे सरकत २०० किमीपर्यंत सरकले आहे. ताशी १३ किलोमीटर वेगाने त्याचा प्रवास सुरू आहे.
राज्याच्या उत्तरेकडील भाग आणि त्याला लागून असलेला गुजरातच्या दक्षिणेकडच्या भागातून हे चक्रीवादळ जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील हरिहरेश्वर ते गुजरातच्या जवळ दमण या दरम्यानच्या पट्ट्यातून या वादळाचा मार्ग असू शकतो. ते अलिबागच्या दिशेने येण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या काळात ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, अशी शक्यता वर्तविली गेली आहे.