मुंबई : कोकण किनारपट्टीच्या दिशेनं घोंगावत आलेल्या आणि तितक्यात प्रचंड ताकदीनं किनारपट्टीवर धडकलेल्या cyclone nisarga  निसर्ग या चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये दिसत आहेत. मुंबईवरली या वादळाचं संकट काही प्रमाणात शमलं असलं तरीही अलिबाग, श्रीवर्धन आणि दिवेआगार येथील किनाऱ्यालगतच्या भागात मात्र वादळाचे परिणाम दिसून आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय वेगानं ज्यावेळी हे चक्रीवादळ अलिबागच्या दिशेनं येण्यास सुरुवात झाली होती, तेव्हा अतिशय वेगानं वारे वाहण्यास सुरुवात झाली होती. वाऱ्याचा वेग हा इतका प्रचंड होता की उंचच उंच असणारी माडाची झाडं एका दिशेनं झुकलेली दिसली. तर, काही मोठमोठाले वृक्षसुद्धा उन्मळून पडल्याचं येथे पाहायला मिळालं. 


एका क्लिकवर पाहा नेमकं कुठे आहे निसर्ग चक्रीवादळ?  


 


तब्बल ५० किलोमीटर इतका केंद्रबिंदू आणि २५० किलोमीटरचा बाह्य परिघ असणाऱ्या या वादळाचं हे भीषण स्वरुप पाहता पुढील काही तास त्याची तीव्रता पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत सहा जिल्यांना या वादळाचा थेट फटका बसला आहे. मुंबई, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग , रत्नागिरी आणि पालघर येथे या चक्रीवादळाचा थेट फटका बसला. 



ताशी १०० ते ११० किलोमीटर अशा वेगानं निसर्ग घोंगावत असताना सोसाट्याच्या वाऱ्यास सुरुवात झाली होती. अनेक ठिकाणी या वादळामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. असं असलं तरीही बहुतांश भागांतून हे वादळ पुढं गेलं असल्यामुळं येत्या सहा तासांमध्ये वादळाची तीव्रता कमी होणार आहे. 


वादळाचा परीघाचा बहुतांश भाग अजूनही समुद्रावरच आहे. संपूर्ण वादळ जमिनीपर्यंत येण्यासाठी किमान तासाभराचा वेळ जाऊ शकतो. सध्या केंद्रस्थानी या वादळाची तीव्रता ९०-१०० किलोमीटर प्रती तास ते ११० किलोमीटर प्रती तास इतकी आहे.  परिणामी पुढच्या सहा तासांत हे चक्रीवादळ ईशान्येला वळणार असून त्याती तीव्रताही कमी होणार आहे, अशी स्पष्ट माहिती भारतीय हवामान विभागानं दिली.