मुंबई : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सुचनेनुसार अरबी समुद्रात 'तौकते' नावाचे चक्रीवादळ तयार होत असून हे चक्रीवादळ दिनांक १५ मे आणि 16 मे रोजी मुंबईच्या जवळ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे वेगाने वारे आणि पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांची छाटणी करणे, समुद्रकिनाऱ्याजवळ पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या वस्त्यांबाबत सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करणे, पाणी तुंबण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी उदंचन संचाची व्यवस्था करणे, मुख्य ६ चौपाट्यांवर पूरबचाव पथके साधनसामुग्रीसह तैनात ठेवणे, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज ठेवणे आणि या अनुषंगाने नागरिकांना वेळोवेळी आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


नागरिकांनी दक्षता घेण्याचे आणि समुद्रकिनारी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. कोविड सेंटरच्या ठिकाणी महापालिकेने विशेष काळजी घेतली आहे. सेंटरच्या आजुबाजुला असलेली झाडे छाटण्यात आली आहेत. 


वीज प्रवाह खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालयांनी तशी तयारी करावी अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत. वीज प्रवाह खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालय क्षेत्रातील जनित्र व इतर आवश्यक ती पर्यायी व्यवस्था सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खातरजमा करुन घ्यावी. तसेच आवश्यक ती इंधन उपलब्धता देखील करवून घ्यावी, जेणेकरुन रुग्णांना देण्यात येणा-या सोयी सुविधांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.