Tauktae चक्रीवादळ : मुंबईत पावसाचा जोर वाढला, नवी मुंबईत एक बळी
मुंबई आणि मुंबई पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील तीन तास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबई : मुंबई आणि मुंबई पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील तीन तास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढताना दिसून येत आहे. नवी मुंबई रात्रीपासून पाऊस पडत आहे. मात्र, सकाळी 8 वाजता जोर कमी झाला होता. त्यानंत 9.15 वाजल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. तर पामबिच सानपाडा येथे विजेचा खांब अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे चक्रीवादळामुळे मुंबईतील मोनो रेल्वे ची वाहतूक आज दिवसभरासाठी बंद करण्यात आली आहे.
जोरदा वाऱ्यासह मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस
दरम्यान, जोरदार वारे वाहतील, असा हवामान विभागाने पुन्हा इशारा दिला आहे. हे वारे ताशी 90-100 किमी प्रतितास वेगाच्या वाहतील. यावेळी जोरदा वाऱ्यासह मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, पालघर, मुंबई, ठाणे व जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढच्या तीन तासात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
Tauktae चक्रीवादळाचा फटका नवी मुंबईला बसला आहे. सानपाडा पामबिच येथे वादळाने विद्युत खांब कोसळला. हा विजेचा खांब विशाल नरळकर यांचा डोक्यात पडला. यात अपघातात विशाल याचा दुर्देवी मृत्यू झाला. सानपाड़ा पामबिच रोडवरील रात्रीची घटना आहे. विशाल कामावरुन निघून घरी ऐरोलीला स्कूटीवरून जात असताना विजेचा खांब डोक्यावर पडला. रात्री जोराचा वारा होता. यावेळी रस्त्यालगत असलेला खांब कोसळला आणि विशालच्या डोक्यात पडला. यात तो गंभीर झाला. त्याचा जागीच मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात 21 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
चक्रीवादळ मुंबईपासून 170 किमी अंतरावर
अरबी समुद्रात निर्माण झालेले आणि गेल्या दोन दिवसांपासून गुजरातच्या दिशेनं सरकत असलेले हे चक्रीवादळ मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. हवामान विभागाच्या ताज्या माहितीप्रमाणे हे चक्रीवादळ मुंबईपासून 170 किमी अंतरावर आहे. हे वादळ हळूहळू पुढे सरकत असून, याचा प्रभाव मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, जळगाव यासह इतरही काही जिल्ह्यात दिसून आला आहे. रविवारी सायंकाळपासून मुंबईत पावसाला सुरूवात झाली. तर पुणे, सातारा आणि जळगाव जिल्ह्यात वादळाचा तडाखा बसला.
चक्रीवादळाचा तडाखा : कोकणात पाऊस; अनेक ठिकाणी पडझड
केरळ, गोवापाठोपाठ सिंधुदुर्ग, रत्नागिरीत रौदरुप धारण केलेल्या तौत्के चक्रीवादळाचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. या चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नसला तरी हवामान विभागानं मुंबई व परिसराला ऑरेज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत काल रात्रीपासूनच जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. तसेच मध्यरात्रीपासूनच मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. वादळ कोकण किनारपट्टीवर रात्री ते धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन या भागातून सुमारे अडीच हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.