दादरमधील एशियाड स्टँड होणार बंद, मुंबई पालिकेचे पत्र
राज्यभरातील विविध शहरांमध्ये जाण्यासाठी सोयिस्कर असलेले दादरमधील दादर-एशियाड स्टँड (बीएमटीसी) बंद करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने तसे पत्रच एसटी महामंडळाला पाठवले आहे.
मुंबई : राज्यभरातील विविध शहरांमध्ये जाण्यासाठी सोयिस्कर असलेले दादरमधील दादर-एशियाड स्टँड (बीएमटीसी) बंद करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने तसे पत्रच एसटी महामंडळाला पाठवले आहे.
सुरक्षेच्या कारणावरून उड्डाणपुलाखालील ‘पे अँड पार्क’ योजना बंद करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला या पत्रात दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत इथल्या स्टँडची जागा लगोलग निष्कासित करण्यास सांगितले आहे. पालिकेच्या उपमुख्य इंजिनीअर (वाहतूक) यांनी नुकतेच एसटीच्या कुर्ला विभाग अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. या पत्राने एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे.
हा स्टँड दादर टीटीकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपुलाखाली आहे. स्टँड बंद झाल्यास वा अन्यत्र स्थलांतरित झाल्यास हजारो प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागण्याची भीती आहे. तसेच, दादर-पुणे मार्गावरील सुपरिचित दादर-पुणे शिवनेरी सेवेसही धक्का बसण्याची शक्यता आहे.