Vitthal Mandir Station: चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनोरेल मार्गिकेमुळे अनेक प्रवाशांचा प्रवास सुखकर झालाय. या मार्गिकेला अजुनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसला तरी मुंबईत मेट्रो आणि रस्त्यांचे जाळे पसरल्यानंतर मोने प्रवासीही वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान मोनो मार्गात येणाऱ्या दादर पूर्व स्थानकाचे नामकरण करण्यात आले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून स्थानिकांकडून ही मागणी होत होती. या मागणीला आता यश आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता  दादर पूर्व स्थानक विठ्ठल मंदिर मोनोरेल स्थानक असे करण्यात आले आहे. शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे स्थानिकांची मोठी मागणी प्रत्यक्षात उतरली आहे. 


दादर पूर्व मोनोरेल स्थानकाजवळ असलेल्या विठ्ठल मंदिराचा इतिहास फार जुना आहे. हे मंदिर अनेक दशकांपासून प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. यामुळे स्थानिक जनतेने येथे उभारण्यात आलेल्या स्थानकाच्या नामकरणाची मागणी केली होती. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. 


खासदार राहुल शेवाळे यांनी जनतेच्या या मागणीबाबत  एमएमआरडीएकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले.


देशातील पहिली आणि एकमेव मोनोरेल 


चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मार्गावर धावणारी ही मोनोरेल देशातील पहिली आणि एकमेव मोनोरेल मार्गिका आहे. ही मार्गिका तोट्यात असून मोनोरेलला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. 


दोन टप्प्यात बनली मार्गिका


चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक अशा 20 किमी लांबीवर मोनोरेल धावते. एमएमआरडीएकडून ही मार्गिकेची उभारण्यात आली आहे. या मार्गिकेतील चेंबूर ते वडाळा असा 8.93 किमीचा पहिला टप्पा आहे. हा टप्पा 4 फेब्रुवारी 2014 रोजी सुरु करण्यात आला. तर दुसरा टप्पा वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा 11.20 किमी लांबीचा असून तो फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरु झाला.