Maharashtra Dahihandi : कोरोनामुळं तब्बल दोन वर्षं दहीहंडी उत्सवाची घागर उताणी पडली. पण यंदाच्या वर्षी ढाकुम्माकुमच्या तालावर दहीहंडीचा थरार चांगलाच रंगणार आहे. कारण मुंबई-ठाण्यात लाखमोलाच्या हंड्या बांधण्याची स्पर्धाच शिवसेनेचा शिंदे गट, ठाकरे गट, भाजप आणि मनसेमध्ये सुरू झालीय. यानिमित्तानं हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांवर लाखो रुपयांच्या बक्षिसांची बरसात होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहीहंडीत 2 कोटींचं 'लोणी'? 
ठाण्यातल्या टेंभी नाक्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दहीहंडी उत्सव रंगणार आहे.  उंच हंड्या फोडणाऱ्या गोविंदा पथकांना अडीच लाख रुपये, तर महिला गोविंदा पथकाला 1 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी दहा थर लावणाऱ्या गोविंदाला पथकाला 21 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय.


जांभळी नाक्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे दहीहंडी बांधणार आहेत. इथं गोविंदा पथकांना 1 लाख 11 हजार 111 रुपयांची दोन बक्षिसं ठेवण्यात आलीत. तर महिला गोविंदा पथकाला 51 हजारांचं बक्षीस दिलं जाणार आहे.


मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही गोविंदा पथकांसाठी 55 लाख रुपयांची बक्षिसं जाहीर केलीत. 


शिवसेना वि. भाजपा 'सामना'
मुंबईत दहीहंडीच्या निमित्तानं शिवसेना विरुद्ध भाजप असा राजकीय सामना पाहायला मिळणार आहे. दादरमध्ये शिवसेना निष्ठेची दहीहंडी बांधणार आहे. तर आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील जांबोरी मैदानातला मेगा दहीहंडी उत्सव यंदा भाजपच्या आशिष शेलारांनी हायजॅक केलाय. मुंबईत तब्बल ३७० ठिकाणी भाजपच्या वतीनं दहीहंड्या बांधल्या जाणार आहेत.


केवळ मुंबई आणि ठाणेच नव्हे तर अगदी पुणे आणि कोल्हापुरातही शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजपमध्ये दहीहंडी आयोजनाची स्पर्धा लागलीय.


आगामी महापालिका निवडणुका आणि सरकारनं शिथील केलेलं निर्बंध यामुळं दहीहंडी उत्सवाचा जल्लोष आणखी वाढलाय. उत्सवाच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीत मतांची हंडी फोडण्यासाठी हा सगळा राजकीय काला रंगलाय.